आटपाडीचा माणगंगा कारखाना विक्रीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:28 IST2021-04-09T04:28:58+5:302021-04-09T04:28:58+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जिल्हा बँकेच्या मालकी हक्कात असलेल्या आटपाडी येथील माणगंगा सहकारी साखर कारखाना विक्रीस काढण्यात आला ...

Atpadi's Manganga factory for sale | आटपाडीचा माणगंगा कारखाना विक्रीस

आटपाडीचा माणगंगा कारखाना विक्रीस

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : जिल्हा बँकेच्या मालकी हक्कात असलेल्या आटपाडी येथील माणगंगा सहकारी साखर कारखाना विक्रीस काढण्यात आला आहे. येत्या १० मे पर्यंत राज्यभरातून निविदा मागविण्यात आल्या असून, कारखान्याच्या सर्व मालमत्तांची एकूण मूलभूत विक्री किंमत ८२ कोटी रुपये ठेवण्यात आली आहे.

भाजप नेते राजेंद्रअण्णा देशमुख यांच्या नेतृत्वाखालील माणगंगा सहकारी साखर कारखान्याकडे जिल्हा बँकेची १०६ कोटी ६५ लाख ७५ हजार रुपये इतकी थकबाकी होती. त्याच्या वसुलीसाठी वर्षभरापूर्वी कारखान्याला ताबा नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर माणगंगा कारखान्याकडील कर्ज वसुलीसाठी जिल्हा बँकेने कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्रअण्णा देशमुख, उपाध्यक्ष भगवानराव मोरे व संचालकांना मागणी नोटीस बजावली होती. वसुली न झाल्याने बँकेने कारखान्याच्या मालमत्तेचा प्रतिकात्मक ताबा घेतला आणि दोनदा लिलाव प्रक्रिया राबविली. त्याला प्रतिसाद न मिळाल्याने बँकेने हा कारखाना स्वत:च्या नावे केला आहे. या कारखान्याची मालकी आता जिल्हा बँकेकडे आहे.

जिल्हा बँकेने ८२ कोटींच्या मूलभूत विक्री किमतीने गुरुवारी निविदा प्रसिद्ध केली. राज्यभरातून यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. १० मेपर्यंत निविदा दाखल करण्याची मुदत असून, त्यानंतर १५ मे रोजी दुपारी प्राप्त निविदा उघडण्यात येणार आहेत. त्यानंतर विक्रीबाबत निर्णय घेतला जाणार आहे. कारखान्याची आटपाडी तालुक्यातील कौठुळी व पुजारवाडी येथे मालमत्ता आहे.

चौकट

विक्रीस काढलेल्या मालमत्तेचे स्वरूप

विक्रीस काढलेल्या मालमत्तेमध्ये साखर कारखान्याची पूर्ण इमारत, मिल हाऊस, बॉयलर हाऊस, बॉयलिंग हाऊस, पॉवर हाऊस, शुगर हाऊस, गोदाम, प्रशासकीय इमारत, विश्रामगृह, डिस्टिलरी युनिट व प्रकल्प तसेच १२५० टीसीडी क्षमतेची मशिनरी यांचा समावेश आहे.

चौकट

आणखी संस्था विक्रीस

थकीत कर्ज वसुलीसाठी जिल्हा बॅँकेने यापूर्वी सहा बडया संस्थांचा लिलाव काढला होता, मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे या संस्था बॅँकेनेच खरेदी केल्या. यामध्ये माणगंगा, महांकाली साखर कारखाना, डिवाईन फूड, प्रतिबिंब गारमेंट, शेतकरी विणकरी सूतगिरणी, विजयालक्ष्मी गारमेंट आदी संस्थांचा समावेश आहे. त्याची आता बॅँकेच्यावतीने विक्री करण्यात येणार असून, लवकरच अन्य संस्थांसाठीही निविदा मागविल्या जाण्याची चिन्हे आहेत.

Web Title: Atpadi's Manganga factory for sale