आटपाडीत ग्रामपंचायत जागेवर डल्ला

By Admin | Updated: February 12, 2015 00:39 IST2015-02-11T22:35:06+5:302015-02-12T00:39:36+5:30

कारवाईची मागणी : उपसरपंचाच्या भावाचे नाव भूखंडावर; ‘सीईओं’ना निवेदन

Atapadi gram panchayat null at the place | आटपाडीत ग्रामपंचायत जागेवर डल्ला

आटपाडीत ग्रामपंचायत जागेवर डल्ला

आटपाडी : आटपाडी ग्रामपंचायतीची जागा उपसरपंच दिनकर पाटील यांचे बंधू सुबराव विष्णू पाटील यांच्या नावावर केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी स्वाभिमानी विकास आघाडीचे नेते भारत पाटील, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय पाटील, पोपट पाटील, चंद्रकांत दौंडे आणि जालिंदर मेटकरी यांनी केली आहे. याबाबत सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले आहे.
या प्रकाराबाबत माहिती देताना भारत पाटील म्हणाले की, आटपाडी ग्रामपंचायतीच्या मालकीची सिटी सर्व्हे नंबर २0३0, २0३१ मधील जागा उपसरपंच दिनकर पाटील यांचे भाऊ सुबराव पाटील हे व्यवसायासाठी भुईभाड्याने वापरत होते. ग्रामस्थांच्या सोयीसाठी सार्वजनिक शौचालय व अंगणवाडी बांधण्यासाठी ग्रामपंचायतीला जागेची आवश्यकता होती. त्यामुळे सुबराव पाटील यांच्याकडे असलेल्या ग्रामपंचायतीच्या मालकीच्या या जागेची नोटीस देऊन मागणी करण्यात आली. जागा आपल्याच ताब्यात ठेवण्यासाठी सुबराव पाटील यांनी न्यायालयात धाव घेऊन दावा दाखल केला.
ग्रामपंचायतीच्या मालकीची ही जागा मिळवून देण्यासाठी सुबराव पाटील यांना ग्रामसेवक यु. बी. पाटील हे सहकार्य करत असल्याचे तत्कालीन सरपंच ताराबाई ऐवळे यांच्या निदर्शनास आले. याबाबत ऐवळे यांनी ग्रामसेवक पाटील यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी प्रतिसाद न दिल्याने गटविकास अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना याबाबत लेखी पत्राने कळविले होते.
मात्र काही दिवसानंतर त्यांचा कार्यकाल संपल्यानंतर ग्रामसेवक पाटील यांनी ही जागा वाचविण्यासाठी न्यायालयात सुरू असलेला दावा चालू ठेवलाच नाही. उलट दावा काढून घेण्यासाठी दि. २४ जानेवारी २0१४ च्या मासिक सभेत ठराव करुन शासकीय जागा ग्रामपंचायतीच्या ताब्यातून काढून घेण्यास सुबराव पाटील यांना एकप्रकारे सहकार्यच केले.
याबाबत ग्रामपंचायत सदस्यांनी दि. १२ मे २0१४ रोजी गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले. मात्र त्यांच्यावर काहीही कारवाई झाली नाही.
विस्तार अधिकारी पी. एम. शिंदे यांच्या सहकार्याने न्यायालयातून दावा मागे घेऊन दि. १४ आॅगस्ट २0१४ च्या मासिक सभेतील ठरावाने शासकीय जागा सुबराव पाटील यांच्या नावावर केली आहे, असा आरोप निवेदनाद्वारे करण्यात आला आहे.
याबाबत चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी करणारे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे यांना देण्यात आले आहे.
या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी कार्यालयासह, आटपाडीचे तहसीलदार जोगेंद्र कट्यारे आणि गटविकास अधिकारी अभिषेक राऊत यांना देण्यात आल्या आहेत. (वार्ताहर)

Web Title: Atapadi gram panchayat null at the place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.