आटपाडी : देशमुखवाडी (ता. आटपाडी) येथील शहाजी गोरख मोरे यांना त्यांच्या शेतातील अडीचशे किलो सोने आणि तीस हिरे असलेले गुप्तधन काढून देतो, असे सांगून त्यासाठी ५१ तोळे सोन्यावर डल्ला मारण्याच्या तयारीत असलेल्या चार भोंदूबाबांना आज मंगळवारी आटपाडी पोलिसांनी अटक केली. धोंडीराम नसरुद्दीन बागवान (२३), बरकत नूरमहंमद (४०, रा. इचलकरंजी), साजिद रोजदार (२५, रा. नेवली, हरियाणा) व खुर्शीद इदलीस (५०, रा बाही, हरियाणा) अशी त्यांची नावे आहेत. शहाजी मोरे यांच्या शेतात काल (सोमवारी) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास चार मांत्रिकांनी खड्डा खणण्यास सांगितले. त्याआधी त्या जागेवर त्यांनी विधी करण्याचे नाटक केले. त्यासाठी मोरे यांच्याकडून तीन हजार रुपये घेतले. खड्डा तीन ते चार फूट खोल जाताच त्यात पांढरे कापड टाकून काही मंत्र पुटपुटल्याचा बहाणा करत हातचलाखीने खड्ड्यातून काही सोन्याची म्हणून नाणी काढून मोरे यांच्या हातावर भोंदूनी ठेवली. गुप्तधन वर येत आहे. आता त्याची पूजा करण्यासाठी नरबळी द्यावा लागेल, असे भोंदंूनी सांगितले. त्यास मोरे यांनी ठामपणे नकार दिला. त्यानंतर गुप्तधनासाठी पूजा करण्यासाठी ५१ तोेळे सोने तरी ठेवावे लागतील, असे भोंदूनी सांगितले. पण एवढे सोने मोरे यांच्याकडे नव्हते. म्हणून आज सकाळी सोन्याची तजवीस करण्यासाठी ते आटपाडीला आले. त्यानंतर भोंदंूचा खरा चेहरा उघड झाला. ग्रामस्थांनी त्यांना चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. (वार्ताहर)चालकामुळे पितळ उघड!भोंदूनी जादा पैसे देऊन किशोर कांबळे (रा. जयसिंगपूर) यांची जीप भाड्याने आणली होती. जीपमध्ये त्यांनी गुप्तधनाच्या पूजेच्या बहाण्याने ५१ तोळे सोने लंपास करण्याची बोलणी चालक कांबळे यांनी ऐकली होती. मोरे आटपाडीत सोन्याची तजवीज करण्यासाठी गेल्यावर त्यांचा मोबाईल नंबर शोधून कांबळे याने भोंदूचा प्लॅन सांगितला. त्यानंतर ग्रामस्थांनी जीपची झडती घेताच अनेक पितळेची सोन्यासारखी दिसणारी नाणी सापडली.
आटपाडीमध्ये चार भोंदूबाबांना अटक
By admin | Updated: September 16, 2014 23:38 IST