सांगली : राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाच्या (एनसीएलटी) आदेशानुसार केन ॲग्रो एनर्जी, लि., रायगाव कंपनीने जिल्हा बँकेकडील थकीत कर्जापोटी ८ एप्रिलपर्यंत १८ कोटींचा पहिला हप्ता भरणे आवश्यक होते. मात्र ही रक्कम भरण्यास कंपनीने टाळाटाळ केल्याने न्यायाधिकारणाने कंपनीच्या प्रतिनिधींची कानउघाडणी केली. १० मेपर्यंत व्याजासह हप्ता भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत.रिझोल्युशन प्रोफेशनल (व्यावसायिक) रितेश महाजन यांनी नुकतीच ऑनलाइन बैठक घेतील. यावेळी थकवलेला पहिलाच हप्ता आता १० मेपर्यंत आठ टक्के व्याजासह भरण्याची सूचना त्यांनी दिली आहे. यामुळे केन ॲग्रोला लाखो रुपयांचा भुर्दंड बसला आहे. केन ॲग्रोस पहिलाच हप्ता मुदतीत भरू शकत नसेल तर रिझोल्युशन प्लॅननुसार (वसुली प्लॅन) पुढील सात वर्षात बँकेची अन्य देणी कशी फेडणार, असा सवाल यावेळी करण्यात आला.केन ॲग्रोला जिल्हा बॅँकेने साखर कारखान्यासाठी दिलेले कर्ज थकीत गेले आहे. या कर्ज वसुलीसाठी राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणासमोर (एनसीएलटी) सादर करण्यात आलेला रिझोल्युशन प्लॅन (वसुली प्लॅन) मंजूर झाला आहे. त्यानुसार पुढील सात वर्षात केन ॲग्रोने ही रक्कम फेडायची आहे. केन ॲग्रो, रायगाव शुगर्स व जिल्हा बॅँकेच्या समझोत्यानुसार एनसीएलटीने हा प्लॅन मंजूर केला आहे. त्यानुसार सात वर्षात जिल्हा बॅँकेच्या थकीत कर्जाचे व्याजासह २२५ कोटी रुपये फेडायचे आहे. यातील १६० कोटी रुपये मुद्दल आहे.या प्लॅननुसार केन ॲग्रोने एनसीएलटीचा निकाल लागल्यानंतर पंधरा दिवसांत जिल्हा बॅँकेच्या थकीत कर्जापोटी १८ कोटींचा पहिला हप्ता भरणे आवश्यक होते. ८ एप्रिल २०२५ पर्यंत याची मुदत होती. ही रक्कम मुदतीत भरली नाही. अखेर याप्रकरणी बॅँकेने रितेश महाजन यांना कळवले. महाजन यांनी नुकतीच याप्रकरणी ऑनलाइन मीटिंग घेतली. यात महाजन, केन ॲग्राचे प्रतिनिधी, जिल्हा बॅँकेसह या कारखान्याकडील अन्य कर्जदार बॅँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
..तर केन ॲग्रो अवसायनात निघणारयापुढेही केन ॲग्रोने एनसीएलटीच्या आदेशानुसार मुदतीत कर्ज न फेडल्यास या कारखान्यावर अवसायक नियुक्ती होऊ शकते. अवसायक कारखान्याची स्थावर व जंगम मालमत्ता विक्री करून कर्जाची परतफेड करतील. पण हा कारखाना पुन्हा केन ॲग्रो किंवा रायगाव शुगर्सला लिलावातही घेता येणार नाही.