पेठ : राज्यात आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी केली जात आहे. यानिमित्ताने सांगली जिल्ह्यातील कासेगाव एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल, पेठ (ता. वाळवा) मधील कलाशिक्षक अरविंद कोळी यांनी चक्क कवडीवर छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र साकारले आहे.शिवरायांचे चित्र साकारण्यासाठी त्यांनी ॲक्रेलिक रंगांचा वापर केला. विशेष म्हणजे हे चित्र रेखाटण्यास त्यांना ५ मिनिटे वेळ लागला. भिंगाचा वापर न करता १ सेमी × १.५ सेमी आकाराचे हे सूक्ष्म चित्र त्यांनी साकारले आहे. कवडीला महाराष्ट्रामध्ये पारंपरिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक महत्त्व आहे. छत्रपती शिवाजी महाराज कवड्यांची माळ परिधान करत होते. हीच प्रेरणा घेऊन अरविंद कोळी यांनी कवडीवर छत्रपती शिवरायांचे चित्र रेखाटले आहे. यापूर्वी शाळेच्या दर्शनी फळ्यावर रंगीत खडूंच्या सहाय्याने त्यांनी छत्रपती शिवरायांची नऊ दुर्मीळ चित्रे प्रथमच रेखाटली होती, त्याची नोंद ग्लोबल गोल्ड टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली होती.
Sangli: ..म्हणून कवडीवर साकारले शिवरायांचे चित्र, कलाशिक्षक अरविंद कोळी यांची अनोखी मानवंदना
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 17:14 IST