मिरज : मिरजेतकाँग्रेस शहराध्यक्षांना बोलावले नसल्याने पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत जोरदार वादावादी झाली. मिरजेचा शहराध्यक्ष सांगलीत अपक्ष उमेदवाराच्या प्रचारात कसा? असा सवाल झाल्याने जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील व शहराध्यक्ष संजय मेंढे यांच्यात जोरदार वादावादी झाली. अपक्ष उमेदवाराचा प्रचार करणाऱ्यांना गद्दार असे म्हटल्यानेही बैठकीत वातावरण तापले.काँग्रेसचेसांगली जिल्ह्याचे निरीक्षक रामहरी रूपनवर, प्रदेश पदाधिकारी आदित्य पाटील व शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मिरजेत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी व संघटनात्मक बदलाच्या पार्श्वभूमीवर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस शहराध्यक्ष संजय मेंढे यांनी अनेकांना बैठकीचा निरोप नसल्याने यांनी बैठक पुढे ढकलण्याची मागणी केली. मेंढे यांनाही या बैठकीचा निरोप मिळाला नसल्याने जाब विचारला. पक्षाचे मिरज शहराध्यक्ष असतानाही तुम्ही सांगलीतील अपक्ष उमेदवाराच्या प्रचारात कसे होता, असा मुद्दा दुसऱ्या बाजूने उपस्थित करण्यात आला. ही निष्ठावंत कार्यकर्त्यांची बैठक आहे. पक्षाच्या विरोधात काम करणाऱ्या गद्दारांना निरोप दिला नसल्याचे पृथ्वीराज पाटील यांनी उत्तर दिल्याने वातावरण चांगलेच तापले. यामुळे दोन्ही बाजूंनी जुगलबंदी झाली. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी वादावादी करणाऱ्यांना शांत केल्यानंतर बैठक पार पडली.
पृथ्वीराज पाटील यांच्याकडून समर्थकांसाठी लॉबिंगशहराध्यक्ष मेंढे यांना हटवून पदाधिकारी बदलाच्या पार्श्वभूमीवर हा वाद झाला. शहराध्यक्षपदासाठी आठ इच्छुकांची नावे सुचविण्यात आली. जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील आपल्या समर्थकांना पदाधिकारी म्हणून निवडीसाठी लॉबिंग करीत असल्याचा आरोप संजय मेंढे यांनी केला.