महापालिका क्षेत्रात भांडवली घरपट्टी लागू
By Admin | Updated: August 9, 2015 00:48 IST2015-08-09T00:30:47+5:302015-08-09T00:48:03+5:30
अधिसूचना प्रसिद्ध : जुन्या मालमत्तांना फटका

महापालिका क्षेत्रात भांडवली घरपट्टी लागू
सांगली : भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टी लागू करण्याची सूचना यापूर्वीच राज्य शासनाने दिली होती. त्यानुसार शनिवारी अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. सूचना व हरकतींचा विचार करून त्यानंतर ही भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टी लागू केली जाणार आहे. त्यामुळे जुन्या मालमत्तांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे.
सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात १ लाख १५ हजार मालमत्तांची नोंद झाली आहे. आणखी काही मालमत्तांच्या नोंदी नव्याने होणार आहेत. अशा परिस्थितीत आता भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टीचा शिरकाव झाल्याने घरपट्टीमध्ये मोठे बदल अपेक्षित आहेत. महापालिका क्षेत्रातील गावठाणातील जुन्या इमारतींची घरपट्टी सध्या कमी आहे. त्यांना भांडवली मूल्याच्या घरपट्टीचा मोठा दणका बसण्याची चिन्हे आहेत.
त्याचबरोबर नव्या इमारतींच्या घरपट्टीतही वाढ होणार आहे. महापालिका क्षेत्रातील घरपट्टी अन्य महापालिकांच्या तुलनेत अधिक आहे. त्यामुळे भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टीमुळे फारसा फरक पडणार नाही, असे मत काही जाणकार नगरसेवकांनी व्यक्त केले आहे. महापालिकेतील निवृत्त जाणकार अधिकाऱ्यांनाही असेच वाटते. भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टीच्या आता नव्याने नोंदी घ्याव्या लागणार आहेत. त्यामुळे पूर्वीच्या आणि आताच्या घरपट्टीत नेमका किती फरक पडणार आहे, याचा अंदाज आताच लागणे कठीण आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी आता नव्या कर आकारणीसाठी तयारी सुरू केली आहे.
हरकती व सूचना प्राप्त झाल्यानंतर त्यावर सुनावणी घेऊन नंतर याची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यामुळे आणखी किमान दीड महिना तरी ही प्रक्रिया चालेल, असा अंदाज आहे. (प्रतिनिधी)