नगराध्यक्षासाठी सासू-सुनेचा अर्ज

By Admin | Updated: October 26, 2016 23:20 IST2016-10-26T23:20:26+5:302016-10-26T23:20:26+5:30

विटा पालिका निवडणूक : सुमित गायकवाड यांची उमेदवारी

The application for the mother-in-law for the city | नगराध्यक्षासाठी सासू-सुनेचा अर्ज

नगराध्यक्षासाठी सासू-सुनेचा अर्ज


विटा : विटा नगरपरिषद निवडणुकीसाठी बुधवारी नगराध्यक्ष पदासाठी कॉँग्रेस पक्षातून माजी आ. सदाशिवराव पाटील यांच्या पत्नी सौ. जयश्रीताई पाटील व विद्यमान नगराध्यक्ष वैभव पाटील यांच्या पत्नी सौ. प्रतिभा पाटील यांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले, तर अशोकराव गायकवाड यांचे पुतणे सुमित गायकवाड यांनीही कॉँग्रेस पक्षातून प्रभाग क्र. ८ साठी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केला.
नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सोमवारपासून सुरू झाली आहे. परंतु, गेल्या दोन दिवसात एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नव्हता. यावेळी नगराध्यक्ष निवड थेट जनतेतून होणार असल्याने आज बुधवारी राष्ट्रीय कॉँग्रेस पक्षातून नगराध्यक्ष पदासाठी सौ. जयश्रीताई पाटील व त्यांच्या स्नुषा सौ. प्रतिभा पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी माजी नगराध्यक्षा मनीषा शितोळे, मालती कांबळे, स्वाती भिंगारदेवे, शारदा पाटील, मीनाक्षी पाटील, अंजना लेंगरे, प्रतिभा चोथे, लता मेटकरी यांच्यासह महिला उपस्थित होत्या.
सत्ताधारी गटाचे नेते व प्रदेश कॉँग्रेसचे उपाध्यक्ष माजी आ. सदाशिवराव पाटील व अशोकराव गायकवाड यांच्या विकास आघाडीत यावेळीही युती होत आहे. त्यामुळे आज बुधवारी गायकवाड यांचे पुतणे सुमित गायकवाड यांनी प्रभाग क्र. ८ मधून उमेदवारी अर्ज दाखल केला.
त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्यादिवशी कॉँग्रेस पक्षातून तीन उमेदवारी अर्ज दाखल झाले. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी माजी आ. पाटील समर्थक कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. गुरुवार व शुक्रवार या दोन दिवसात कॉँग्रेस, शिवसेना पक्षासह इतर गटाची उमेदवारी अर्ज दाखल होणार आहेत. दरम्यान, विटा नगरपरिषदेसाठी कॉँग्रेस व शिवसेना पक्षातच प्रमुख लढत होत आहे. त्यापार्श्वभूमीवर कॉँग्रेस व शिवसेना पक्षाने मोठ्या प्रमाणात मोर्चेबांधणी केली आहे. (वार्ताहर)

Web Title: The application for the mother-in-law for the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.