लग्नपत्रिकेच्या धर्तीवर मतदारराजाला आवाहन
By Admin | Updated: September 17, 2014 23:04 IST2014-09-17T22:52:40+5:302014-09-17T23:04:44+5:30
यासाठी प्रशासनही या धामधुमीत मागे नाही. लोकसभा निवडणुकीवेळी प्रशासनाचा यामधला सहभाग चांगलाच चर्चेचा ठरला

लग्नपत्रिकेच्या धर्तीवर मतदारराजाला आवाहन
तासगाव : लोकशाहीने तमाम भारतीयांना मतदानाचा समान अधिकार प्राप्त करून दिला आहे. यंदा विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान झाले पाहिजे, यासाठी आता प्रशासनानेही कंबर कसली आहे. लग्नपत्रिकेच्या धर्तीवर तयार करण्यात आलेली आवाहन पत्रिका सध्या चर्चेचा विषय बनली आहे.तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष लागून राहणार आहे. राजकीय पक्ष व त्यांचे उमेदवार मतदान आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करणार आहेत. एव्हाना ते प्रयत्न सुरूही झाले आहेत. परंतु निवडणूक, मतदानाचा हक्क व लोकशाही तळागाळात पोहोचली पाहिजे, यासाठी प्रशासनही या धामधुमीत मागे नाही. लोकसभा निवडणुकीवेळी प्रशासनाचा यामधला सहभाग चांगलाच चर्चेचा ठरला होता. लोकांनी मतदान केले पाहिजे, हा त्यामागचा हेतू सुस्पष्ट आहे.तासगावच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीवर सध्या एक पत्रिका झळकत आहे. इमारतीत जाताना सामान्य माणूस ही पत्रिका वाचल्याशिवाय पुढे जात नाही. ही पत्रिका आहे, १५ आॅक्टोबरच्या मुहूर्ताची. या मंगलप्रसंगी मतदान करून निवडणूक कार्यक्रमाची शोभा वाढविण्याची विनंती करण्यात आली आहे.
आपापल्या गावातील मतदान केंद्र हे स्थळ आहे. विशेष म्हणजे ‘आहेर स्वीकारू नये’ची टीप या पत्रिकेत आवर्जून घालण्यात आली आहे. (वार्ताहर)