अपेक्स प्रकरण विधानसभेत मांडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:32 IST2021-07-07T04:32:39+5:302021-07-07T04:32:39+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कोरोनाबाधित ८७ रुग्णांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या मिरज येथील अपेक्स रुग्णालयप्रकरणी विधानसभेत आवाज उठवून सरकारला ...

The Apex case will be tabled in the Assembly | अपेक्स प्रकरण विधानसभेत मांडणार

अपेक्स प्रकरण विधानसभेत मांडणार

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : कोरोनाबाधित ८७ रुग्णांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या मिरज येथील अपेक्स रुग्णालयप्रकरणी विधानसभेत आवाज उठवून सरकारला कारवाईबाबत जाब विचारण्यात येईल, असे आश्वासन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगलीतील भाजप नेत्यांना दिले.

अपेक्सप्रकरणी विधानसभेत आवाज उठवावा, या मागणीसाठी सोमवारी भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ, आमदार गोपीचंद पडळकर, माजी मंत्री आ. सदाभाऊ खोत, अश्रफ वांकर, रवींद्र ढगे, दीपक माने यांनी देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. या प्रकरणाची सविस्तर माहिती घेताना फडणवीस यांनी हे प्रकरण धक्कादायक असल्याचे मत व्यक्त केले. हे प्रकरण विधानसभेत ताकदीने मांडू, अशी ग्वाही त्यांनी दिली

आ. गाडगीळ यांनी सांगितले की, मिरज येथील अपेक्स रुग्णालयामध्ये २०७ कोरोनाबाधित दाखल झाले होते. त्यापैकी ८७ रुग्णांचा मृत्यू झाला. ही आकडेवारी सर्वांसाठीच धक्कादायक होती. या रुग्णांवर योग्य उपचार केले गेले नाहीत. त्यांच्याबाबत अक्षम्य हयगय केली गेली. मृत्यूचे आकडे लपवले गेले. या रुग्णालयात रुग्ण दाखल व्हावेत यासाठी एक साखळी तयार करण्यात आली होती. अशी अनेक प्रकरणे यानिमित्ताने समोर आली आहेत. भाजपच्या रेट्यामुळे रुग्णालयाचा प्रमुख डॉक्टर महेश जाधव याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यासह अन्य कर्मचारी आणि डॉक्टर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाची व्याप्ती पाहता आणि ८७ रुग्णांचा बळी गेला असल्यामुळे दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे. विधानसभेच्या पटलावर हा विषय आल्यानंतर तपासाला अधिक वेग येईल, अशी अपेक्षा भाजप नेत्यांनी व्यक्त केली.

चौकट

आयुक्तांवरही कारवाई व्हावी

अपेक्सला परवानगी देणाऱ्या महापालिका आयुक्तांवरही कारवाई होणे आवश्यक आहे. या प्रक्रियेतील अन्य अधिकाऱ्यांचीही चौकशी करून या सर्वांवर सदोष मनुष्यवधाचाही गुन्हा दाखल व्हावा, अशीही मागणी आ. गाडगीळ यांनी फडणवीस व चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली.

Web Title: The Apex case will be tabled in the Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.