अपार्टमेंटला घरपट्टीच नाही!
By Admin | Updated: September 17, 2014 23:05 IST2014-09-17T22:58:40+5:302014-09-17T23:05:59+5:30
अपार्टमेंटला घरपट्टीच नाही!

अपार्टमेंटला घरपट्टीच नाही!
मिरज : मिरजेत महापालिकेच्या कर विभागाने सहा वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या अपार्टमेंटला अद्याप घरपट्टी आकारणी सुरू केली नसल्याचे माहिती अधिकारात उघड झाली आहे. याबाबत तक्रारीनंतर कर अधीक्षकांनी अपार्टमेंटमधील मालमत्ताधारकांना करआकारणीची नोटीस बजावली आहे.
मिरजेतील हायस्कूल रस्त्यावर एका अपार्टमेंटच्या बांधकामाला २००५ मध्ये परवानगी देण्यात आली. २००८ मध्ये १३ फ्लॅट व ९ दुकानगाळ्यांचे बांधकाम पूर्ण झाले. मात्र त्यानंतर तब्बल सहा वर्षे अपार्टमेंटमधील फ्लॅट व गाळेधारकांना घरपट्टी आकारणी करण्यात आली नाही. हिंद चॅरिटेबलचे फारूख बागवान यांनी माहितीच्या अधिकारात विचारणा केल्यानंतर महापालिकेने अपार्टमेंटमधील मालमत्ताधारकांच्या कर आकारणीकडे दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट झाले. याबाबत बागवान यांनी आयुक्तांकडे तक्रार केल्यानंतर कर अधीक्षकांनी अपार्टमेंटमधील फ्लॅट व गाळेधारकांना दि. १० जुलै रोजी नोटीस बजावली आहे. सबंधित मालमत्ताधारकांची गेल्या सहा वर्षांची घरपट्टी वसूल करावी व महापालिकेचे आर्थिक नुकसान करणाऱ्या कर विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, यासाठी महापालिका कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार असल्याचे फारूख बागवान यांनी निवेदनात म्हटले आहे.
केवळ मिरजेत नव्हे तर सांगली व कुपवाडमधील अनेक अपार्टमेंटला अद्याप घरपट्टी लागू केलेली नाही. त्यामुळे पालिकेच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. (वार्ताहर)
५सोयीस्कर दुर्लक्ष
मालमत्ता कर विभागात सावळागोंधळ सुरू आहे. काही दिवसांपूर्वी मालमत्ता कर भरलेल्या मिळकतधारकांना जप्तीच्या नोटिसा देण्यात आल्या होत्या. आता बांधकाम पूर्ण झालेल्या अपार्टमेंटच्या कर आकारणीकडे दुर्लक्ष केल्याची तक्रार आहे. त्यानंतर तरी पालिकेला जाग येईल का? असा प्रश्न आहे.