इस्लामपुरातील सावकार जलाल मुल्लावर दुसरा गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:18 IST2021-07-03T04:18:18+5:302021-07-03T04:18:18+5:30
इस्लामपूर : शहरामध्ये बेकायदेशीरपणे खासगी सावकारी करणाऱ्या आणि सध्या पोलिसांच्या अटकेत असणाऱ्या जलाल मुसा मुल्ला या सावकाराविरुद्ध आणखी एक ...

इस्लामपुरातील सावकार जलाल मुल्लावर दुसरा गुन्हा दाखल
इस्लामपूर : शहरामध्ये बेकायदेशीरपणे खासगी सावकारी करणाऱ्या आणि सध्या पोलिसांच्या अटकेत असणाऱ्या जलाल मुसा मुल्ला या सावकाराविरुद्ध आणखी एक गुन्हा नोेंद झाला. तक्रारदाराला १५ टक्के व्याजदराने दिलेल्या ५० हजाराच्या वसुलीपोटी मुल्ला याने त्याचा साडेअकरा लाखांचा मालट्रक स्वत:च्या नावावर करून घेतला आहे. दरम्यान, मुल्ला शनिवारपर्यंत पोलीस कोठडीत आहे.
मुद्दसर उस्मानगनी गोलंदाज (वय ३६) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. फेब्रुवारी २०२० मध्ये ट्र्रकला टायर घालण्यासाठी पैशाची गरज असल्याने गोलंदाज यांनी जलाल मुल्ला याच्याकडून १५ टक्के व्याजदराने ५० हजार रुपये घेतले होते. यावेळी मुल्ला याने गोलंदाज यांच्याकडून दोन कोरे धनादेश घेतले होते. एका महिन्याच्या व्याजाची ७५०० रुपयांची रक्कम कापून ४२ हजार ५०० रुपये गोलंदाज यांना दिले होते. गोेलंदाज यांनी ९ महिन्यांत ६७ हजार ५०० रुपयांचे व्याज मुल्ला याला दिले होते. त्यानंतर लॉकडाऊनमुळे संपूर्ण व्यवसाय ठप्प झाल्याने गोलंदाज यांच्याकडून मुद्दल आणि व्याज दिले गेले नाही. त्यामुळे मुल्ला याने गोलंदाज यांना दमदाटी व शिवीगाळ करत ऑक्टोबर २०२० मध्ये त्यांच्या नावावरील ट्रक (एमएच १४ एफटी ७२७३) नोटरी करून स्वत:च्या ताब्यात घेतला होता.
सांगली पोलिसांनी खासगी सावकारीविरुद्ध मोहीम उघडल्यामुळे गोलंदाज यांनी पोलिसांत धाव घेतली. दरम्यान, पोलिसांनी जलाल मुल्ला याची दुचाकी हस्तगत केली आहे. मालट्रक ताब्यात घेताना केलेल्या नोटरीमध्ये दोन लाख रुपये गोलंदाज यांना दिल्याचे लिहून घेतले आहे. मात्र, प्रत्यक्षात ही रक्कम गोलंदाज यांना दिली गेलेली नाही. सहायक पोलीस निरीक्षक अरविंद काटे अधिक तपास करीत आहेत. सावकार मुल्ला याच्याविरुद्ध हा दुुसरा गुन्हा दाखल झाला आहे.