अण्णासाहेब पाटील पुन्हा पोलीस कोठडीत
By Admin | Updated: December 23, 2014 00:37 IST2014-12-23T00:37:07+5:302014-12-23T00:37:07+5:30
बँक खात्याची माहिती मागविली

अण्णासाहेब पाटील पुन्हा पोलीस कोठडीत
सांगली : येथील अण्णासाहेब पाटील जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेत सव्वाबारा कोटींचा घोटाळा केल्याप्रकरणी अटकेत असलेला संस्थेचा संस्थापक-अध्यक्ष अण्णासाहेब पाटील याच्यावर रुग्णालयात उपचार करून पोलिसांनी पुन्हा त्याची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. त्याची कसून चौकशी सुरू असून, बँक खात्याची माहिती मागविली असल्याचे जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी सांगितले.
गेल्या आठवड्यात अण्णासाहेब पाटील न्यायालयात शरण आला होता. न्यायालयाच्या आदेशाने पोलिसांनी त्याला अटक केली. तो २५ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत आहे. रविवारी दुपारी प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्याला उपचारार्थ सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचारानंतर डॉक्टरांनी त्याला सोडले, परंतु आर्थिक गुन्हे शाखेने पुन्हा त्याला कोठडीत घेतले आहे.
जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत म्हणाले, पाटील हा मुख्य संशयित आहे. त्याची कसून चौकशी सुरू आहे. कोट्यवधी अपहाराची रक्कम कुठे गेली? याचा अद्याप उलगडा झालेला नाही. यासाठी त्याच्या बँक खात्याची माहिती मागविली आहे. ती येत्या एक-दोन दिवसात मिळेल. यातील आणखी दोघे संशयित फरारी आहेत. त्यांचाही शोध सुरू आहे. तपासाची व्याप्ती मोठी आहे. त्याच्या कोठडीची मुदत संपल्यानंतर ती पुन्हा न्यायालयाकडून वाढवून मागण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)