वनविभागाच्या कारवाईचा प्राणिमित्रांकडून निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:18 IST2021-06-21T04:18:39+5:302021-06-21T04:18:39+5:30
वनविभागाने पीपल्स फॉर ॲनिमल या संस्थेकडून उपचार सुरू असलेले जखमी वन्यप्राणी व पक्षी ताब्यात घेऊन संस्थेचे अध्यक्ष ...

वनविभागाच्या कारवाईचा प्राणिमित्रांकडून निषेध
वनविभागाने पीपल्स फॉर ॲनिमल या संस्थेकडून उपचार सुरू असलेले जखमी वन्यप्राणी व पक्षी ताब्यात घेऊन संस्थेचे अध्यक्ष अशोक लकडे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही संस्था व लकडे कुटुंब गेली ३५ वर्षे लोकवर्गणीतून जखमी बेवारस प्राणी व पक्ष्यांची अहोरात्र सेवा करीत आहेत. हजारो वन्यजिवांची शुश्रुषा करून त्यांना जीवदान देण्यात आले आहे. विषारी साप, पिसाळलेले प्राणी पकडणे, जखमी प्राण्यांवर उपचार करून त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडणे हे काम प्राणिमित्र जीव धोक्यात घालून व स्वखर्चाने करीत असताना वनविभागाच्या अन्यायी कारवाईमुळे यापुढे प्राणिमित्रांनी प्राणी व पक्ष्यांची सेवा करावी का नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गेली अनेक वर्षे वनविभागाला संस्थेतर्फे मुक्या, बेवारस, जखमी प्राण्यांची शुश्रुषा केली जाते हे माहीत आहे. वनविभागास कळवून प्राण्यांवर उपचार सुरू असल्याचा लेखी पत्रव्यवहार, छायाचित्रे व व्हिडिओ उपलब्ध आहेत. मात्र संस्थेला बदनाम करण्याच्या हेतूने वनविभागाने कारवाई केल्याने यापुढे प्राणिमित्रांना काम थांबवावे लागणार असल्याचेही प्राणिमित्रांनी निवेदनात म्हटले आहे.
प्राणिमित्रांची नाहक बदनामी थांबवावी अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांची पोलखोल करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचेही अशोक लकडे, विकास जाधव, मुस्तफा मुजावर, प्रशांत सरगर, सचिन हिंदळकर, अमित पाटील, राकेश जाधव, श्रीमंधर भिलवडे, अनिल भुपे, परशुराम सांगावे, प्रभाकर स्वामी, दिगंबर कोरे, महेश सुतार यांनी निवेदनात म्हटले आहे.