अनिल बाबर अखेर शिवसेनेत!
By Admin | Updated: July 29, 2014 23:30 IST2014-07-29T23:22:31+5:302014-07-29T23:30:19+5:30
उद्धव ठाकरेंची घेतली भेट : प्रवेशाचा कार्यक्रम लवकरच

अनिल बाबर अखेर शिवसेनेत!
विटा : खानापूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते माजी आमदार अनिल बाबर यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. आज, मंगळवारी बाबर यांनी मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन प्रवेशाबाबत चर्चा केली.
ठाकरेंनीही प्रवेशाला ‘ग्रीन सिग्नल’ दिल्याने बाबर यांनी प्रवेशाबाबतची अधिकृत घोषणा केली.
बाबर यांनी दोनवेळा विधानसभेत प्रतिनिधित्व केले. २००४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या चिन्हावर, तर २००९ च्या निवडणुकीतही अपक्ष म्हणून त्यांनी निवडणूक लढविली. दोन्ही निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. गत लोकसभा निवडणुकीत बाबर यांनी आघाडी धर्मामुळे कॉँग्रेसचे प्रतीक पाटील यांचा प्रचार केला होता. तरीही काही वर्षांपासून राष्ट्रवादीबाबत बाबर नाराज होते. लोकसभा निवडणुकीनंतर त्यांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा जिल्ह्यात रंगली होती. बाबर यांनी खानापूर व आटपाडी तालुक्यांतील अनेक गावांत कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन त्यांची मते जाणून घेतली. आज बाबर यांनी काही मोजक्याच कार्यकर्त्यांना सोबत घेऊन मुंबईत शिवसेना भवनात उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. बाबर व ठाकरे यांच्यात अर्धा ते पाऊण तास चर्चा झाली. भेटीवेळी शिवसेनेच्या आ. नीलम गोऱ्हे, आ. सुभाष देसाई उपस्थित होते. विट्यात सभा घेऊन प्रवेशाचा कार्यक्रम घेण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. बाबर यांच्यासह त्यांचा गटही शिवसेनेत प्रवेश करणार आहे. (वार्ताहर)
लोकसभा निवडणुकीत मी आघाडी धर्म पाळला होता. या निवडणुकीनंतर मात्र मतदारसंघातील माझ्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसमधून बाहेर पडून शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी माझ्यावर सातत्याने दबाव आणला. त्यामुळे मतदारसंघातील बऱ्याच गावांतील कार्यकर्ते व जनतेशी संवाद साधून मी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या आगामी मेळाव्यात राष्ट्रवादी सोडण्याची नेमकी भूमिका मांडू.
- अनिल बाबर,
माजी आमदार