विटा : टेंभू योजनेच्या बंदिस्त पाइपलाइनचे सोडलेले पाणी तासाभरातच बंद केले. त्यामुळे संतप्त झालेल्या ढवळेश्वर (ता. खानापूर) येथील शेतकऱ्यांनी बुधवारी विटा येथील टेंभू योजनेच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला. राजकीय दबावापोटी पाणी बंद केल्याचा आरोप करीत शेतकऱ्यांनी टेंभूच्या अधिकाऱ्यांना सुमारे दोन तास कार्यालयात कोंडून ठेवले. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर अखेर टेंभूच्या अधिकाऱ्यांनी सायंकाळी सहा वाजता टेंभूचे पाणी सोडले.ढवळेश्वर येथील जलसिंचनाच्या टाकीमधून बंदिस्त जलवाहिनीतून परिसरातील नऊ लहान तलाव भरून घेतले जातात. बुधवारी दुपारी १२:०० वाजण्याच्या सुमारास या टाकीमध्ये पाणी सोडण्यात आले. हा संदेश राहुल मंडले यांनी सोशल मीडियातून शेतकऱ्यांना दिला. मात्र, या संदेशानंतर अवघ्या तासाभरातच सोडलेले पाणी अधिकाऱ्यांनी बंद केले. त्यानंतर संतप्त झालेले शेतकरी थेट विट्यात येऊन टेंभू योजनेच्या शाखा कार्यालयासमोर आले. त्यावेळी पाणी बंद का केले? असा सवाल शेतकऱ्यांनी कालवा निरीक्षकांना विचारला. शाखा अभियंता अमितकुमार साठे यांनी तोंडी आदेश दिल्याने पाणी बंद केल्याचे निरीक्षकांनी सांगितले.त्यानंतर शेतकऱ्यांनी आपला मोर्चा शाखा अभियंता साठे यांच्याकडे वळविला. त्यावेळी साठे यांनी वरिष्ठांचा दबाव असल्याचे कारण दिले. त्यामुळे शेतकरी चांगलेच संतप्त झाले. शेतकऱ्यांनी प्रचंड घोषणाबाजी करीत कार्यालयाला टाळे ठोकून अधिकाऱ्यांना दोन तास डांबून ठेवले. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मध्यस्थी केली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी ढवळेश्वरसाठी पाणी सोडले जाईल, असे आश्वासन दिले. शिवाय अधिकाऱ्यांनी नरमाईची भूमिका घेत सायंकाळी सहा वाजता टेंभू योजनेचे पाणी सोडले.यावेळी भाजपचे पंकज दबडे, संदीप ठोंबरे, नीलेश पाटील, दाजी पवार, प्रमोद भारते, ढवळेश्वरचे राहुल मंडले, सामजाई तुंबगी, हणमंत किर्दत, अजित कीर्दत, गुरुनाथ किर्दत, बाळासो पवार, अमोल कांबळे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी..आमदार गोपीचंद पडळकर यांच्यामुळे टेंभूचे पाणी सोडले म्हणून काही स्थानिक राजकीय मंडळी शेतकऱ्यांना वेठीस धरत आहेत. दुसरीकडे राजकीय नेत्यांची मर्जी सांभाळण्यासाठी अधिकाऱ्यांनीही शेतकऱ्यांवर अन्याय करणे सुरू केले आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांच्या घरात पाणी भरणाऱ्या अशा अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी भाजपचे अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप ठोंबरे यांनी केली.