रुग्णांचे प्राण वाचविणाऱ्या रुग्णवाहिका स्वत:च मृत्युपंथाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:28 AM2021-03-09T04:28:44+5:302021-03-09T04:28:44+5:30

सांगली : कोरोनाने जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेतील भगदाडे वेशीवर टांगली, त्यात प्रामुख्याने रुग्णवाहिकांचाही समावेश आहे. चौदा प्राथमिक आरोग्य केंद्रांकडील रुग्णवाहिका ...

The ambulance that saved the lives of the patients died on its own | रुग्णांचे प्राण वाचविणाऱ्या रुग्णवाहिका स्वत:च मृत्युपंथाला

रुग्णांचे प्राण वाचविणाऱ्या रुग्णवाहिका स्वत:च मृत्युपंथाला

Next

सांगली : कोरोनाने जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेतील भगदाडे वेशीवर टांगली, त्यात प्रामुख्याने रुग्णवाहिकांचाही समावेश आहे. चौदा प्राथमिक आरोग्य केंद्रांकडील रुग्णवाहिका भंगार स्थितीत असून त्यातूनच रुग्णाला प्राणदान देण्यासाठी पळापळ करावी लागत आहे.

ग्रामीण आरोग्य अभियान आणि राज्य शासनाकडून प्रत्येक आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका मिळाल्या आहेत. त्यातील १४ रुग्णवाहिकांचे दहा वर्षांचे आयुष्य कधीच संपले आहे. दोन लाख ४० हजार किलोमीटरहून अधिक धाव घेत शेकडो रुग्णांचे प्राण वाचविले आहेत. आता त्या स्वत:च मृत्युपंथाला लागल्या आहेत. आरोग्य केंद्रापासून तालुक्याला मोठ्या रुग्णालयात पोहोचेपर्यंत त्यांची स्वत:चीच दमछाक होत आहे. बहुतांश रुग्णवाहिका सुमो जीप मॉडेलच्या आहेत. रुग्णांची ने-आण करण्याबरोबरच जिल्हा व तालुक्यावरून आरोग्य केंद्राचे साहित्य आणणे, ऑक्सिजन सिलिंडर आणणे, प्रसंगी वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना तालुका-जिल्ह्याला नेणे, अशी कामेही करावी लागतात. ग्रामीण भागात उपकेंद्रांच्या गावाचे रस्ते खराब असल्यानेही रुग्णवाहिकांचा खुळखुळा होतो. अशा रुग्णवाहिका रुग्णाला प्राणांतिकप्रसंगी वेगाने तालुक्याला नेऊ शकत नाहीत. प्रसूती वेदनांनी तळमळणाऱ्या गर्भवतींना तालुक्याला नेणे, केंद्रात प्रसूती झालेल्या महिलांना घरी सोडणे इतपतच त्यांची कार्यक्षमता शिल्लक राहिली आहे. या आरोग्य केंद्रांना आता नव्या रुग्णवाहिकांची प्रतीक्षा आहे.

चौकट

सिव्हिलकडे दररोज डझनभर रुग्ण

जिल्हाभरातील आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालयातून दररोज किमान डझनभर रुग्ण सांगलीत तसेच मिरजेत सिव्हिल रुग्णालयात पाठविले जातात. यामध्ये सर्पदंशापासून अपघातापर्यंतचे रुग्ण असतात. विशेषत: गुंतागुंतीच्या प्रसूतीसाठी गर्भ‌वतींना सिव्हिलला न्यावे लागते. दररोज जिल्हाभरातून रुग्णवाहिका सांगलीत सिव्हिलमध्ये येत असतात.

चौकट

जिल्ह्यात ६२ आरोग्य केंद्रांकडे स्वत:च्या रुग्णवाहिका आहेत. पैकी काही अधिग्रहित आहेत, तर उर्वरित स्वत:च्या आहेत. काहींचे चालक जिल्हा परिषदेचे आहेत, तर काहींचे कंत्राटी आहेत. गेल्या काही वर्षांत सर्वच आरोग्य केंद्रांना स्वत:ची रुग्णवाहिका असेल याकडे जिल्हा परिषदेने लक्ष दिले आहे.

चौकट

विम्याची खबरदारी

प्रत्येक रुग्णवाहिकेचा विमा असेल याचीही दक्षता आरोग्य विभागाने घेतली आहे. विमा असला तरच आरटीओ पासिंग होत असल्याने तो काढण्याकडे विशेष लक्ष दिले जाते.

चौकट

१०८ रुग्णवाहिकांनी हलका केला भार

जिल्ह्यात ६२ आरोग्य केंद्रे आहेत. प्रत्येक केंद्राकडे स्वत:ची रुग्णवाहिका आहे. त्यातील चौदा केंद्रांकडील रुग्णवाहिका भंगार झाल्याने निर्लेखित करण्यात आल्या आहेत. यामध्ये भिलवडी, खंडेराजुरी, आटपाडी, मांगले, शिरशी, कामेरी, येडेमच्छिंद्र, देशिंग, रांजणी, आगळगाव, कोंत्येवबोबलाद, वळसंग, बिळूर व येळवी या केंद्रांचा समावेश आहे. यातील बहुतांंश गावे सांगली-मिरजेपासून दूर अंतरावर असल्याने जुनाट रुग्णवाहिका नेणे जोखमीचे ठरते. अशावेळी १०८ सेवेच्या रुग्णवाहिका अत्यंत मोलाच्या ठरतात. ग्रामस्थदेखील तातडीच्या प्रसंगी आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिकेवर विसंबून न राहता १०८ क्रमांकावर कॉल करतात.

कोट

रुग्णवाहिकेचे दिवे सुस्पष्ट नसल्याने रात्रीची वाहतूक करता येत नाही. तालुक्याला रुग्ण नेण्याची जोखीम पत्करणे शक्य नसते. तातडीच्या प्रसंगी नातेवाईक खासगी वाहनाने रुग्ण नेतात. याबाबत वरिष्ठांना कल्पना दिली आहे. सध्या आरोग्य केंद्राच्या साहित्याची वाहतूक किंवा जवळच्या रुग्णांची ने-आण यासाठी रुग्णवाहिका वापरात आहे.

- एक चालक

कोट

जिल्ह्याला दूर अंतरावर गंभीर रुग्ण नेण्यासारखी रुग्णवाहिकेची स्थिती नाही. आसने खराब झाली आहेत. टायरही झिजले आहेत. २ लाख ४० हजार किलोमीटर अंतर झाल्याने नव्या रुग्णवाहिकेची प्रतीक्षा आहे. रात्री-बेरात्री १०८ रुग्णवाहिकेला ग्रामस्थ बोलवून घेतात. आमची रुग्णवाहिका जवळच्या अंतरासाठी तसेच उपकेंद्राकडील वाहतुकीसाठी वापरात आहे.

- एक चालक

कोट

जिल्ह्यातील चौदा आरोग्य केंद्रांसाठी आधुनिक सोयी-सुविधा असणाऱ्या रुग्णवाहिका उपलब्ध करणार आहोत. त्याच्या निविदाही प्रसिद्ध झाल्या आहेत. बीएस ६ मानकाच्या व टाईप बी श्रेणीच्या रुग्णवाहिका लवकरच उपलब्ध होतील. त्यासाठी ग्रामपंचायतीच्या वित्त आयोगातून सुमारे २ कोटी ४० लाख रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे. यामुळे भंगार रुग्णवाहिकांची समस्या संपेल.

- प्राजक्ता कोरे, अध्यक्षा, जिल्हा परिषद.

Web Title: The ambulance that saved the lives of the patients died on its own

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.