सांगलीत रुग्णवाहिका चालक रुग्णांसाठी देवदूतच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:24 IST2021-04-18T04:24:41+5:302021-04-18T04:24:41+5:30
सांगली : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी डॉक्टर, नर्स, पोलीस यांसह अत्यावश्यक सेवेतील सर्व योद्धे आपली सेवा बजावत आहेत. ...

सांगलीत रुग्णवाहिका चालक रुग्णांसाठी देवदूतच
सांगली : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी डॉक्टर, नर्स, पोलीस यांसह अत्यावश्यक सेवेतील सर्व योद्धे आपली सेवा बजावत आहेत. यातील महत्त्वाचा घटक म्हणजे रुग्णवाहिका चालक हा आहे. गेल्या वर्षभरापासून रुग्णवाहिका चालक रजा, सुट्ट्या न घेता आपले कर्तव्य चोख बजावत आहेत. रुग्णांना रुग्णालयांपर्यंत आणणे आणि उपचारानंतर त्यांना घरापर्यंत सोडणे हे महत्त्वाचे काम ते प्रामाणिकपणे करीत आहेत.
रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी देवासारखे धावून येऊन डॉक्टरांपर्यंत पोहोचविणारे रुग्णवाहिका चालक अत्यंत मोलाची कामगिरी बजावतात. कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे ‘सोशल डिस्टन्सिंग’च्या कारणास्तव माणूस माणसापासून दूर गेला असताना, रुग्णवाहिकांनी कोरोना रुग्णांना हॉस्पिटलपर्यंत पोहोचवायची जबाबदारी अतिशय दक्षपणे आणि अहोरात्र चालवली. नातेवाईकही तुम्हाला हात धरून हॉस्पिटलपर्यंत पोहोचवू शकत नाहीत. अशावेळी एकाकी पडलेल्या रुग्णांना खरा मदतीचा हात देत आहेत ते रुग्णवाहिका चालकच. आपला जीव धोक्यात घालून हजारो रुग्णांना जीवनदान मिळवून देण्यासाठी ते प्रयत्न करीत आहेत. अशाच कामगिरीवर असलेले आयुब कोतवाल जिल्हा परिषद आरोग्य केंद्रात गेल्या पाच वर्षांपासून रुग्णवाहिका चालकाचे कर्तव्य बजावत आहेत. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांबरोबर कोणीच येत नाही. अशावेळी आयुबच रुग्णालयापर्यंतच्या प्रवासात त्या रुग्णाला धीर देण्याचे काम करतात. काका भिऊ नका, तुम्हाला काहीच होणार नाही. तुम्ही लगेच बरे व्हाल. डॉक्टर खूप चांगले उपचार करीत आहेत, असा धीर ते देतात.
आयुब कोतवाल अनुभवाबद्दल सांगतात, कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण भले मोठ्या कुटुंबातील असले तरी त्यांचे नातेवाईक त्यांच्याबरोबर येत नाहीत. रुग्णाच्या मृत्यूनंतरही अंत्यसंस्कारासाठी कोणी येत नाही. आम्हीच पीपीई किटमध्ये काळजी घेऊन मित्रांच्या सहकार्याने अनेक कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर अंत्यसंस्कारही केले आहेत. संकट कितीही मोठे असले तरी माणुसकी विसरून चालणार नाही.
सचिन जाधव म्हणाले, सध्या कोरोनाच्या संकटात एकमेकांना सहकार्य व मदत करणे ही आपली जबाबदारी आहे. संकट कोणतेही असो, माणुसकी विसरू नये. रुग्णवाहिका चालक असल्याने रुग्णांबाबत अनेकदा वेगवेगळे प्रसंग समोर येतात. या वेळी प्रत्येक रुग्ण हा आपल्या कुटुंबातील सदस्य असल्याच्या भावनेने मला जेवढे जमेल तितके सहकार्य मी करतो. सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे.
चौकट
जिल्ह्यातील रुग्णवाहिका
- जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्र : ७०
- ग्रामीण रुग्णालय : ११
- महापालिका क्षेत्रात खासगी रुग्णवाहिका : १००
- जिल्ह्यातील खासगी रुग्णवाहिका : ११०