कोरोनाने शाळा बंद केल्या, तरी स्वाध्यायाने अभ्यास सुरू ठेवला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:16 IST2021-03-30T04:16:48+5:302021-03-30T04:16:48+5:30
फोटो २९ वेदांत दुधनी लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कोरोना व लॉकडाऊनकाळात शाळा बंद राहिल्या तरी विद्यार्थ्यांच्या अभ्यासात मात्र ...

कोरोनाने शाळा बंद केल्या, तरी स्वाध्यायाने अभ्यास सुरू ठेवला
फोटो २९ वेदांत दुधनी
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोरोना व लॉकडाऊनकाळात शाळा बंद राहिल्या तरी विद्यार्थ्यांच्या अभ्यासात मात्र खंड पडला नाही. शिक्षण संशोधन परिषदेने तंत्रज्ञानाचा आधार घेत स्वाध्याय उपक्रम सुरू केला, त्यामुळे जिल्ह्यातील पहिली ते दहावीचे ३० ते ३५ टक्के विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात कायम राहिले.
स्वाध्याय उपक्रमांतर्गत पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे मोबाइलच्या माध्यमातून शिक्षण अखंडित ठेवण्याचा प्रयत्न शिक्षण परिषदेने केला आहे. यासाठी लिंक तयार केली आहे. विद्यार्थ्यांनी लिंकवर नोंदणी केल्यानंतर परिषदेकडून आठवडाभरासाठी ३० प्रश्न दिले जातात. विद्यार्थ्याने ते सोडविल्यानंतर काही वेळातच उत्तरे मिळतात. ती विद्यार्थ्याला पडताळून पाहता येतात. चुकलेल्या उत्तरांची योग्य माहिती दीक्षा ॲपद्वारे लगेच दिली जाते. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येत असून त्याचा चांगला फायदा विद्यार्थ्यांना झाला आहे.
जिल्ह्यात सुरुवातीला उपक्रमाला प्रतिसाद नव्हता, पण नंतर शिक्षकांच्या, शिक्षण विभागातील अधिकारी यांच्या बैठकांमधून त्याचे महत्त्व पटविण्यात आले. सध्या त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. उपक्रमाचा १९ वा आठवडा सुरू आहे. विविध वर्गांतील सुमारे १.४२ लाख विद्यार्थी त्याचा लाभ घेताहेत. हे प्रमाण जिल्ह्यातील एकूण विद्यार्थीसंख्येच्या ३० ते ३५ टक्के इतके आहे. नोव्हेंबरमध्ये सुरू झालेल्या या उपक्रमात दिवसेंदिवस विद्यार्थ्यांची भर पडत आहे.
पॉइंटर्स
अशी आहे आकडेवारी
जिल्ह्यातील एकूण विद्यार्थी - पाच लाख नऊ हजार ४८६
स्वाध्यायासाठी नोंदणी केलेले विद्यार्थी - दोन लाख ४० हजार ४७७
स्वाध्याय सोडविणारे विद्यार्थी - एक लाख ४२ हजार ३५६
चौकट
या उपक्रमात मराठी माध्यमाचे एक लाख १० हजार ९८२ विद्यार्थी सहभागी झाले आहेत. इंग्रजी माध्यमाच्या २७ हजार २९९, तर उर्दू माध्यमाच्या चार हजार ७५ विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. उपक्रमाच्या १९ व्या आठवड्याअखेर एक लाख ४२ हजार ३५६ विद्यार्थी स्वाध्यायाच्या माध्यमातून अध्ययन करत आहेत.
कोट
मोबाइलवर येणा-या प्रश्नांची उत्तरे शोधतो. पुस्तकातील प्रश्न असल्याने लगेच उत्तरे मिळतात. त्यामुळे शाळेत गेलो नाही, तरी अभ्यास सुरू राहतो.
- आझम निशाणदार, इयत्ता पाचवी
कोट
स्वाध्यायामध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे चुकली, तर दीक्षामध्ये ती समजतात. काही अवघड प्रश्न आईबाबांकडून सोडवून घेतो. स्वाध्यायामध्ये अभ्यासातील प्रश्नच विचारले जातात.
- वेदान्त दुधनी, इयत्ता चौथी
कोट
डॉ. रमेश होसकोटी (प्राचार्य डाएट)
मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात स्वाध्याय उपक्रमाची प्रभावी व परिणामकारक अंमलबजावणी सुरू आहे. सर्व पर्यवेक्षीय यंत्रणेवर स्वाध्याय उपक्रमाची जबाबदारी सोपवलेली आहे. कोरोना व लॉकडाऊनकाळात शाळा बंद असल्या, तरी विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये, यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे. विद्यार्थ्यांचा प्रतिसाद चांगला आहे.
- डॉ. रमेश होसकोटी, प्राचार्य, शिक्षण व प्रशिक्षण केंद्र, सांगली
कोट
स्वाध्याय उपक्रमात आणखी विद्यार्थ्यांचा सहभाग वाढणे अपेक्षित आहे. राज्यात गुणवत्तेबाबत जिल्हा तिस-या क्रमांकावर आणण्याचे उद्दिष्ट आहे.
- जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी