लाचखोरीत पुरुषांच्याबरोबरीने महिला अधिकारीही आघाडीवर; सांगली जिल्ह्यात वर्षभरात १३ गुन्ह्यांमध्ये महिला किती..
By संतोष भिसे | Updated: December 21, 2024 16:41 IST2024-12-21T16:40:05+5:302024-12-21T16:41:20+5:30
संतोष भिसे सांगली : आधुनिक महिला प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून घोडदौड करीत असताना लाचखोरीत तरी कशा मागे ...

लाचखोरीत पुरुषांच्याबरोबरीने महिला अधिकारीही आघाडीवर; सांगली जिल्ह्यात वर्षभरात १३ गुन्ह्यांमध्ये महिला किती..
संतोष भिसे
सांगली : आधुनिक महिला प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून घोडदौड करीत असताना लाचखोरीत तरी कशा मागे राहतील? सांगली जिल्ह्यात गेल्या वर्षभरात लाचखोरीचे १३ गुन्हे घडले, त्यामध्ये पाच लाचखोर महिलांचा समावेश आहे.
लाच घेण्यात महसूल आणि पोलिस हे दोन विभाग आघाडीवर आहेत. तर महिला लाचखोरांमध्ये या दोन्ही विभागांतील महिला कर्मचारी व अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यातील काही लाचखोर महिला निलंबित आहेत, तर काहींचा निलंबन कालावधी संपून त्या पुन्हा ‘लोकसेवे’त रुजू झाल्या आहेत. इस्लामपूर व येडेनिपाणी येथे तलाठी, वायफळे येथेही तलाठी, समाजकल्याणमध्ये वरिष्ठ अधिकारी आणि मंगळवारी विश्रामबाग पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी म्हणजे लाचखोर महिलांच्या प्रतिनिधी ठरल्या आहेत.
महिलांचे सबलीकरण झाले पाहिजे, अशी शासनाची व समाजाची भूमिका असताना या अधिकारी महिला लाचखोरीमध्ये सबल होत असल्याचे दिसत आहे. विविध शासकीय खात्यांत महिलांचे प्रमाण वाढत आहे. तेथे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांकडे शंकेने पाहिले जाईल, अशी स्थिती हे लाचखोर महिला कर्मचारी निर्माण करीत आहेत. विश्रामबागमधील महिला पोलिसाने तब्बल ५० हजारांची लाच घेतल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे म्हणणे आहे. त्यावरून या महिलेचा आत्मविश्वास किती बळावला असावा, हे लक्षात येते.
महसूल विभागातील महिला कर्मचाऱ्यांची लाचखोरी विशेष चर्चेची ठरली आहे. आतापर्यंत सापडलेल्या महिला तलाठ्यांपैकी एकीने वाळू तस्करांवर चांगलाच ‘वचक’ निर्माण केला होता. अर्थात, या ‘वचका’ची पुरेपूर वसुली त्यांनी केली असावी, अशी शंका घेण्यास जागा आहे. लाच घेताना ती रंगेहात सापडल्याने या शंकेला बळ मिळते. विशेष म्हणजे लाचखोरीमध्ये तिने पुरुष कर्मचारी व सहकाऱ्यांनाच साखळीत ओढले होते, हेदेखील स्पष्ट झाले आहे. तक्रार आल्याने ती जाळ्यात सापडली; पण तक्रार आली नसलेली किती प्रकरणे तिने लीलया हातावेगळी केली याचाही तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने करण्याची गरज आहे.
महिला म्हणून स्वस्तात काम नाहीच
लाच मागण्यात सामान्यत: पुरुष अधिकारी व कर्मचारी दबदबा निर्माण करतात. रक्कम ठरवताना रेटून बोलतात; पण या महिलांनी मागितलेली किंवा स्वीकारलेली रक्कम पाहता, त्यांची मागणीही स्वस्तातील नाही हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्यांची घोडदौड सुरू असल्याचे दिसून येते.