इस्लामपुरात दोनशेवर घरकुलांचे होणार वाटप
By Admin | Updated: November 27, 2014 23:55 IST2014-11-27T23:17:25+5:302014-11-27T23:55:07+5:30
पालिका सभेत ठराव : झोपडपट्टी सुधारणा योजना

इस्लामपुरात दोनशेवर घरकुलांचे होणार वाटप
इस्लामपूर : इस्लामपुरातील झोपडपट्टी सुधारणा योजनेंतर्गत २४० घरकुलांचे वाटप, रस्ते रुंदीकरणाच्या कामासाठी समिती स्थापन करण्यासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा सुशोभिकरणासाठी लोकप्रतिनिधींच्या स्थानिक विकास निधी, लोकवर्गणी जमा करण्याच्या विषयांना पालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली, तर कोटींची उड्डाणे घेणारा स्वच्छता ठेका, दिवाबत्ती, जंतुनाशके खरेदी-साठी फेरनिविदा मागवण्याचे ठरले.
उपनगराध्यक्ष संजय कोरे, मुख्याधिकारी नीलेश देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत आज गुरूवारी सर्वसाधारण सभा झाली. आयत्यावेळच्या विषयात विरोधी पक्षनेते विजय कुंभार यांच्यावर निशाणा साधत खंडेराव जाधव यांनी नाले बुजवणाऱ्या नगरसेवकांवर कारवाई करा. अशा घटनेचा पंचनामा करून त्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवा, असे स्पष्ट करीत ठराव घ्यायला लावला. त्याला कुंभार यांनी संमती दर्शवत ठराव कराच, असे आव्हान दिले.
सभेच्या मूळ विषयपत्रिकेवरील चर्चेला सुरुवात होण्यापूर्वी अॅड. चिमण डांगे यांनी श्रध्दांजलीचा ठराव मांडला. त्यानंतर उपनगराध्यक्ष संजय कोरे यांनी शहराचा आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू नितीन मदने याला पालिकेतर्फे आर्थिक मदत देऊन ‘इस्लामपूर भूषण’ पुरस्काराने सन्मानित करा, जवखेडे हत्याकांड, बेळगावमधील कर्नाटक शासनाच्या अरेरावीचा निषेध व्हायला हवा, असे सांगत सलग ६ व्यावेळी विधानसभा निवडणूक जिंकल्याबद्दल आमदार जयंत पाटील यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला.
खंडेराव जाधव यांनी नितीन मदने हा आपल्या पालिका कर्मचाऱ्याचा मुलगा आहे. आशियाई कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्रातील तो एकमेव खेळाडू होता. याच स्पर्धेत महिला गटातून खेळलेल्या पुण्याच्या खेळाडूला पुणे महापालिकेने १५ लाख रुपये आणि २१ लाख रुपये किमतीची मॅट देण्याचे जाहीर केले. इस्लामपूर पालिकेनेही मदने याला जास्तीत-जास्त मदत करावी अशी मागणी केली. त्यावर सभागृहात बराच काथ्याकूटझाला. त्यावेळी जाधव यांनी पालिकेला जमत नसेल तर मी स्वत: दोन लाख रुपये देतो, तुम्ही फक्त मानपत्र द्या, असे सुनावले.
सभेत वारसाहक्काने नोकरी मिळण्यासाठी आलेल्या अर्जांना मान्यता दिली. २२४० घरकुलांचे वाटप करताना २४ कुटुंबांची एक सोसायटी करून त्यांच्याकडून सर्व पूर्तता करून घेण्याचा निर्णय झाला. अॅड. चिमण डांगे यांनी डिजिटल फलकांबाबत उच्च न्यायालयाच्या निर्देशांची माहिती द्या, अशी मागणी केली. मुख्याधिकाऱ्यांनी त्या विषयीची माहिती दिली. शेवटी तासाभराने मुख्य विषयांना सुरुवात झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा सुशोभिकरण गतीने करण्याचा निर्णय झाला.
कासेगाव शिक्षण संस्थेने मागितलेल्या २ हेक्टर जागेसाठी ना-हरकत प्रमाणपत्र मागणीच्या अर्जावर विरोधी पक्षनेते विजय कुंभार यांनी आक्षेप घेतला. यापूर्वी शिक्षण संस्थेला जागा देण्यात आल्या आहेत. आता मागितलेल्या जागेबाबत प्रस्तावित विकास आराखड्यात काय आरक्षण आहे, अशी विचारणा केली. मात्र सभागृहाने ना हरकत पत्र देण्याचा निर्णय घेतला. उर्दू जि. प. शाळा क्रमांक तीनला १0 हजार रुपये शैक्षणिक निधी देण्याचा निर्णय झाला. सुरक्षारक्षक नेमण्याच्या विषयावरही चर्चा झाली. (वार्ताहर)