जिल्हा बँक निवडणुकीपूर्वी सर्वपक्षीय संशयकल्लोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:29 IST2021-09-21T04:29:38+5:302021-09-21T04:29:38+5:30
सांगली : एकमेकांच्या संस्थांबद्दल चौकशांची मागणी केल्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीपूर्वी सध्या सर्वच पक्षांमध्ये संशयकल्लोळ सुरू आहे. अशा परिस्थितीत ...

जिल्हा बँक निवडणुकीपूर्वी सर्वपक्षीय संशयकल्लोळ
सांगली : एकमेकांच्या संस्थांबद्दल चौकशांची मागणी केल्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीपूर्वी सध्या सर्वच पक्षांमध्ये संशयकल्लोळ सुरू आहे. अशा परिस्थितीत अनेक नेत्यांनी संस्थांच्या ठरावाच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन केल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध करण्याच्या प्रयत्नांना सर्वपक्षीय बाधा निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.
सांगली जिल्हा बँकेचे संचालकपद प्रतिष्ठेचे मानले जाते. हेवीवेट नेते या संचालक मंडळात असतात. मागील पंचवार्षिक निवडणुकीत जयंत पाटील यांनी केलेले बिनविरोध निवडीचे प्रयत्न फसले होते. यंदा त्यापेक्षा बिकट परिस्थिती दिसत आहे. राज्यातील राजकीय समीकरणे बदलली असून जिल्ह्यातील राजकीय समीकरणेही कमालीची बदलली आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना यांची महाआघाडी एकत्र असल्याने विरोधातील भाजपला काही जागा देऊन निवडणूक बिनविरोध करता येईल, असे गणित राष्ट्रवादी नेत्यांनी आखले होते, मात्र गेल्या आठवडाभरात सर्व चित्र बदलले असल्याने हे गणित फसण्याचीच शक्यता अधिक दिसत आहे. प्रत्येक पक्षाने आपली ताकद दाखविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यातून सर्वसमावेशक संचालक मंडळ तयार होईल, असे वाटत नाही.
चौकट
सर्वांची स्वतंत्र तयारी
जिल्ह्यात शिवसेनेने बँकेच्या निवडणुकीनिमित्त स्वतंत्र बैठक घेतली. काँग्रेसच्या पदाधिकारी व नेतेमंडळींनीही आपसांत चर्चा केली आहे. भाजपमार्फतही स्वबळाची चाचपणी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वच पक्षांत सध्या ताकदीचा आढावा घेतला जात आहे.
चौकट
पक्षांतर्गत मतभेद चव्हाट्यावर
सहकारी संस्थांच्या कर्जवसुली व कारवाईवरून सध्या वादंग निर्माण झाले आहे. संस्थेच्या चौकशीवरून भाजपअंतर्गत खासदार संजयकाका पाटील व पृथ्वीराज देशमुख यांच्यात तर राष्ट्रवादीत आ. मानसिंगराव नाईक व अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांच्यात मतभेद निर्माण झाले आहेत. पक्षांतर्गत मतभेद वाढल्याने त्याचे परिणामही निवडणुकीत दिसण्याची शक्यता आहे.
कोट
सहकार व राजकारण वेगवेगळे असले तरी भाजपच्या वतीने स्वतंत्रपणे लढण्याचीही तयारी आहे. अनेक मतदारसंघांत भाजप नेत्यांचे प्राबल्य असल्याने आम्ही त्यासाठी सज्ज आहोत.
- दीपक शिंदे-म्हैसाळकर, शहर अध्यक्ष, भाजप
कोट
शिवसेनेची जिल्ह्यात ताकद असल्यामुळे आम्ही जिल्हा बँकेच्या निवडणुकीची तयारी करीत आहोत. ताकदीप्रमाणे सन्मान मिळाला तर ठीक, अन्यथा आम्ही ताकदीने लढू.
- संजय विभुते, जिल्हाप्रमुख, शिवसेना
कोट
पक्षांतर्गत सर्व महत्त्वाच्या नेत्यांशी, पदाधिकाऱ्यांशी चर्चा सुरू आहे. आम्ही जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सज्ज आहोत. सर्वसमावेशक जागावाटप झाले तर बिनविरोधसाठी विचार करू. अन्यथा योग्य निर्णय घेऊ.
- आ. विक्रम सावंत, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस