अवाजवी वैद्यकीय बिल वसुलीसाठी सर्वपक्षीय मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:18 IST2021-06-28T04:18:51+5:302021-06-28T04:18:51+5:30
सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या नातेवाईकांकडून अनेक रुग्णालयांनी अवाजवी वैद्यकीय बिले घेतली आहेत. बिलांच्या ऑडिटसाठी नेमलेल्या यंत्रणेतही उणिवा आहेत. त्यामुळे ...

अवाजवी वैद्यकीय बिल वसुलीसाठी सर्वपक्षीय मोहीम
सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या नातेवाईकांकडून अनेक रुग्णालयांनी अवाजवी वैद्यकीय बिले घेतली आहेत. बिलांच्या ऑडिटसाठी नेमलेल्या यंत्रणेतही उणिवा आहेत. त्यामुळे या रकमेच्या वसुलीसाठी सर्वपक्षीय मोहीम हाती घेतली आहे, अशी माहिती खासदार संजयकाका पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले की, सर्वच डॉक्टरांबद्दल किंवा वैद्यकीय क्षेत्राबद्दल आमची तक्रार नाही. मात्र, अनेक रुग्णालयांनी सामान्य लोकांना लुटण्याचा उद्योग केला आहे. रेमडेसिविरचा काळाबाजार, बिलांच्या ऑडिटमधून समोर आलेल्या गोष्टींवरुन केवळ काहीअंशी हा बाजार समोर आला. प्रत्यक्षात रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी अनेकांनी मुकाट्याने अवाजवी बिले भरली आहेत. या सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी, डॉक्टरांनी घेतलेली अवाजवी बिले परत घेण्यासाठी आम्ही सर्वच पक्षांचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी एकत्र येणार आहोत.
जिल्हाधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा करुन सर्वच रुग्णालयांचे, डायग्नोस्टिक सेंटरचे ऑडिट करण्याची तसेच आमच्याकडे प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार अवाजवी रकमेची वसुली करण्याची मागणी आम्ही करणार आहोत. संबंधित रुग्णालयाच्या दारातही आंदोलन करण्यात येईल. जोपर्यंत या रकमा मिळणार नाहीत, तोपर्यंत आम्ही रुग्णालयाच्या दारातून उठणार नाही.
जिल्ह्यात महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभही केवळ १५ टक्के रुग्णांना मिळाला आहे. त्याबाबतही आम्ही तक्रार करणार आहोत. जास्तीत जास्त रुग्णांना याचा लाभ मिळायला हवा होता. पैशाच्या हव्यासापोटी सामान्य लोकांचा छळ आम्ही होऊ देणार नाही. दुसरी लाट अद्याप कायम असताना तिसऱ्या लाटेची भीती आहे. त्यापूर्वी ही यंत्रणा सुधारण्यासाठी आम्ही ताकद पणाला लावू.
चौकट
अपेक्स प्रकरणही तडीस नेऊ
अपेक्स प्रकरणात पोलीस व जिल्हा प्रशासन कारवाई करत असले तरी हे प्रकरण तडीस नेण्यासाठी आम्ही सर्वपक्षीय लोक ताकद लावू, असे संजयकाका पाटील म्हणाले.
चौकट
अधिकाऱ्यांच्या कामात उणिवा
प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जितक्या आत्मियतेने काम करायला हवे होते, तितकी त्यांची आत्मियता दिसली नाही. कारभारात प्रचंड उणिवा राहिल्या. जे अधिकारी चांगले काम करत नाहीत, त्यांच्याबाबतही जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करु, असे पाटील म्हणाले.