Sangli: ऑल इंडिया चॅम्पियन संभाजी पाटील-सावर्डेकर यांचे निधन
By घनशाम नवाथे | Updated: April 26, 2025 17:32 IST2025-04-26T17:31:49+5:302025-04-26T17:32:06+5:30
सांगली : कुस्तीमध्ये ऑल इंडिया युनिव्हर्सिटी चॅम्पियन तसेच शिक्षण, क्रीडा, कला, सांस्कृतिक, कृषी, सहकार क्षेत्रातील अष्टपैलू व्यक्तिमत्व अशी ओळख ...

Sangli: ऑल इंडिया चॅम्पियन संभाजी पाटील-सावर्डेकर यांचे निधन
सांगली : कुस्तीमध्ये ऑल इंडिया युनिव्हर्सिटी चॅम्पियन तसेच शिक्षण, क्रीडा, कला, सांस्कृतिक, कृषी, सहकार क्षेत्रातील अष्टपैलू व्यक्तिमत्व अशी ओळख असलेले मराठा समाजचे विद्यमान अध्यक्ष ॲड. पै. संभाजी गोविंद पाटील-सावर्डेकर (वय ७८) यांचे आज, शनिवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले.
मुळ सावर्डे (ता. तासगाव) येथील सावर्डेकर कुटुंबाची कुस्तीमध्ये देशभर ओळख आहे. भारतभीम ज्योतीरामदादा सावर्डेकर, मल्लसम्राट विष्णूपंत सावर्डेकर यांचा कुस्ती क्षेत्रातील घराण्याचा वारसा संभाजी पाटील-सावर्डेकर यांनी समर्थपणे चालवला. दोन चुलत्यांच्या कडक शिस्तीत संभाजी सावर्डेकर यांनी कुस्तीचे धडे गिरवले. शिवाजी विद्यापीठ, इंटर युनिव्हर्सिटी बोर्ड, इंडिया कुस्ती विभाग, ऑल इंडिया युनिव्हर्सिटी चॅम्पियन, महान भारत केसरी अशा वेगवेगळ्या कुस्ती स्पर्धेत त्यांनी प्रतिनिधीत्व केले.
१९७० मध्ये त्यांनी शिवाजी विद्यापीठास ऑल इंडिया चॅम्पियनशीप मिळवून दिली. कुमार भारत केसरी स्पर्धेत आशियायी सुवर्णपदक विजेता कर्तारसिंगशी टक्कर देत लक्ष वेधून घेतले. दिग्गज नेते यशवंतराव चव्हाण व संजय गांधी यांनी त्यांचे कौतुक केले होते. सलग दोनवेळा महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या अधिवेशनात महाराष्ट्र चॅम्पियन सन्मानासह मिळवले. कुस्ती क्षेत्रासह वकीलीत आणि मराठी चित्रपटातून अभिनेते म्हणूनही छाप पाडली होती.
संभाजी सावर्डेकर यांनी हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी, कर्नाटक केसरीसह अनेक राष्ट्रीयस्तरावर कामगिरी करणारे मल्ल घडवले. भोसले व्यायाम शाळेचा सर्वत्र दबदबा निर्माण केला. वसंतदादा कारखान्याचे उपाध्यक्ष, सहकार बाेर्डचे संचालक, वसंतदादा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विश्वस्त म्हणूनही कार्य केले. सावर्डे (ता. तासगाव) गावातही विविध कामातून ठसा उमटवला. अलिकडेच डिसेंबर २०२४ मध्ये त्यांची मराठा समाज संस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. कुस्तीक्षेत्रासाठी त्यांनी वाहून घेतले होते. त्यांच्या पश्चात तीन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. माजी खासदार संजय पाटील यांचे मामा होत.