सांगली : महापालिकेच्या सर्व विभागांचे कामकाज आता पूर्णपणे ऑनलाइन होणार असून, दि. १ सप्टेंबरपासून सर्व फायली आयुक्तांकडे थेट ऑनलाइन मंजुरीसाठी जाणार आहेत. ‘ई-ऑफिस’ या आधुनिक प्रणालीतून हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे आयुक्त सत्यम गांधी यांनी पत्रकार बैठकीत सांगितले. या नव्या प्रणालीमुळे फायलींचा एका टेबलावरून दुसऱ्या टेबलावर होणारा त्रासदायक प्रवास थांबणार आहे.महापालिकेत आजवर कोणतीही परवानगी अथवा प्रशासकीय मंजुरी मिळविण्यासाठी फाइल हाती घेऊन कर्मचाऱ्यांना एका विभागातून दुसऱ्या विभागात जावे लागत असे. त्यामुळे वेळेचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत होता. तसेच पारदर्शकतेच्या अभावामुळे नागरिकांच्या तक्रारीही वाढत होत्या. या पार्श्वभूमीवर ई-ऑफिस ही संकल्पना महापालिकेने दि. १ सप्टेंबरपासून अंमलात आणली आहे.याबाबत आयुक्त गांधी म्हणाले की, नवीन प्रणालीत फायली थेट संगणकावरून संबंधित अधिकाऱ्यांकडे पोहोचतील. मंजुरी किंवा आक्षेप नोंदविण्याची प्रक्रियादेखील ऑनलाइन होणार आहे. त्यामुळे कामकाजात वेग येणार असून, फाइल अडकवण्याचे प्रकार टळतील. महापालिकेच्या कारभारातही पारदर्शकता येईल. दि. १ सप्टेंबरपासून फाइल प्रक्रियेचे सर्व काम ऑनलाइन केले जाईल.याप्रणालीमधून टपाल, नस्ती, मंजुरी, आदेश, परिपत्रके डिजिटलमध्येच विभाग प्रमुखांमार्फत मान्यतेस सादर होतील. त्यावर स्वाक्षरीदेखील डिजिटल असेल. फाइल, टपाल यांचा प्रवास ऑनलाइन समजेल, कोणत्या विभागाकडे किती फाइल, किती दिवस प्रलंबित आहेत याचा अहवाल वरिष्ठांकडे प्राप्त होतील. त्यामुळे प्रलंबित फायलींचे प्रमाण कमी होऊन प्रशासकीय कामकाजामध्ये सुसूत्रता येणार आहे.
यासाठी महापालिकेला कोणताही खर्च आलेला नाही. सर्व लिपिकांचे यूजर आयडी तयार झाले आहेत. विभाग प्रमुखांचे प्रशिक्षण घेण्यात आले आहे. या नव्या सुविधेमुळे प्रशासकीय कामाकाजामध्ये अधिक पारदर्शकता, वेळेची बचत आणि कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होईल, असे गांधी यांनी सांगितले.