33 कोटी वृक्ष लागवडसाठी सर्व घटकांचे सहकार्य आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 14:23 IST2019-07-03T14:22:22+5:302019-07-03T14:23:40+5:30
सन 2019 साठी राज्यात 33 कोटी वृक्षलागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला असून यामध्ये सांगली जिल्ह्याचे 72 लक्ष वृक्षलागवडीचे उद्दिष्ट आहे. पुढील तीन महिने ही मोहिम सुरू राहणार असून या मोहिमेमध्ये लावलेली रोपे जतन करण्यासाठी स्थानिक नागरिक, सामाजिक संस्था, मंडळे, निसर्गप्रेमी या सर्व घटकांचा सहभाग आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.

33 कोटी वृक्ष लागवडसाठी सर्व घटकांचे सहकार्य आवश्यक
सांगली : सन 2019 साठी राज्यात 33 कोटी वृक्षलागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला असून यामध्ये सांगली जिल्ह्याचे 72 लक्ष वृक्षलागवडीचे उद्दिष्ट आहे. पुढील तीन महिने ही मोहिम सुरू राहणार असून या मोहिमेमध्ये लावलेली रोपे जतन करण्यासाठी स्थानिक नागरिक, सामाजिक संस्था, मंडळे, निसर्गप्रेमी या सर्व घटकांचा सहभाग आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.
महाराष्ट्र शासनाच्या सन 2019 च्या पावसाळ्यात 33 कोटी वृक्ष लागवड या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमांतर्गत सांगली जिल्ह्यात 72.29 लक्ष वृक्षलागवडीचा मुख्य कार्यक्रम मिरज तालुक्यातील दंडोबा डोंगर, भोसे येथे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्याहस्ते झाला. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, उपवनसंरक्षक (प्रा.) प्रमोद धानके, उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात, मिरज तहसिलदार शरद पाटील, कवठेमहांकाळ तहसिलदार शिल्पा ठोकडे, सरपंच सुहास पाटील, ग्राम वन संरक्षण समितीचे विविध सदस्य, विविध शाळांचे विद्यार्थी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, सांगली जिल्ह्यात 33 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम या वर्षी 1 जुलै ते 30 सप्टेंबर या कालावधीत राबवण्यात येणार आहे. त्यासाठी सांगली जिल्ह्याला 72.29 लक्ष वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. तीन महिने सुरू राहणाऱ्या या वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत लावण्यात येणारी रोपे जतन करण्यासाठी वन विभाग, सामाजिक वनीकरण विभाग, जिल्हा परिषद या शासकीय यंत्रणांबरोबरच समाजातील सर्व घटकांचे सहकार्य आवश्यक आहे.
सुमारे 220 टँकरव्दारे पाणी पुरवठा होत असलेल्या व अनेक चारा छावण्या सुरू असलेल्या, सातत्याने दुष्काळ व टंचाईग्रस्त असणाऱ्या सांगली जिल्ह्यासाठी वृक्ष लागवड मोहिमेचे महत्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळे याकडे केवळ शासकीय कार्यक्रम म्हणून न पाहता सर्वांनी एक चळवळ म्हणून पहावे. वृक्ष, निसर्ग यावर प्रेम करणारी आपली संस्कृती आहे.
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अभिजीत राऊत म्हणाले, जिल्ह्यात 72 लाख रोपांची लागवड करण्यात येणार आहे. यातील 23 लाख रोपे जिल्हा परिषदेमार्फत लावली जाण्यात येणार आहेत. 33 कोटी वृक्ष लाववडीची मोहिम यशस्वी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर पुढाकार घ्यावा. प्रत्येक विद्यार्थ्यांने एका झाडवर आपल्या नावाची पाटी लावावी व या झाडाला पाणी घातल्याशिवाय जेवायचे नाही असा निश्चय करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
उपवनसंरक्षक (प्रा.) प्रमोद धानके प्रास्ताविकात म्हणाले, सांगली जिल्ह्याचे वनक्षेत्र केवळ 5 टक्के आहे. हे वाढविण्यासाठी वन विभागामार्फत मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात आहेत. कोणालाही झाडे लावावयाची असल्यास माहे जुलै ते सप्टेंबर महोत्सव कालावधीत वड, पिंपळ, जांभुळ, चिंच, आवळा, लिंबू, बांबू, पेरू, सिताफळ, शेवगा आदि प्रजातींची रोपे सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तरी निसर्गप्रेमींनी याचा लाभ घेऊन मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड मोहिमेत सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. या कार्यक्रमात वनविभाग, सामाजिक वनीकरण विभाग, ग्रामपंचायत यासह 48 यंत्रणांचा सहभाग असून 72.29 लक्ष उद्दिष्टाच्या तुलनेत 77.90 लक्ष रोपे लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे.