लोकमत न्यूज नेटवर्कसांगली: शहरात घराच्या दरवाजावर तसेच फ्लॅटवर अनोळखी व्यक्तींची थाप पडल्यानंतर दार उघडताच महिलांच्या गळ्यातील दागिना हिसकावून पळून जाण्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच सकाळी किंवा सायंकाळी फिरायला बाहेर पडणाऱ्या महिलांच्या गळ्यातील दागिना हिसकावून मारून लंपास करण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
सांगलीत तसेच उपनगरात गेल्या काही दिवसांपासून बंद घरे, फ्लॅट फोडण्याचे प्रकार वाढू लागलेत. फ्लॅटच्या दरवाजाची बेल वाजल्यानंतर दार उघडताच काही कळण्यापूर्वी गळ्यातील दागिना हिसडा मारून तोडून पळून जाण्याचे दोन प्रकार घडलेत. ग्रामीण भागातही अशा पद्धतीने चोऱ्या अधिक प्रमाणात होताना दिसत आहेत. त्यामुळे दिवसा किंवा रात्री घराच्या दरवाजाची बेल वाजल्यानंतर दरवाजाच्या बाहेर कोण आहे? व्यक्ती ओळखीची आहे का? याची खात्री करूनच दरवाजा उघडण्याची गरज आहे.
तुमच्या घराच्या दरवाजाला लेन्स आहे का?
घराच्या दरवाजाला मध्यभागी लेन्स बसविल्या जातात. अनेकांच्या घराला अशा प्रकारच्या लेन्स आहेत. त्यामुळे दरवाजाची बेल वाजल्यानंतर लेन्समधून बाहेर कोण उभे आहे? हे बघता येते. अनेकजण दरवाजाला लेन्स बसवत नाहीत. परंतु ही लेन्स बसवायला सोपी आहे. त्यामधून दरवाजासमोर कोण उभे आहे, हे पटकन समजते. त्यानंतर आपण दरवाजा उघडायचा की नाही हे ठरवू शकतो. तसेच घराच्या सुरक्षेसाठी चॅनल गेट आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे ही अलीकडच्या काळात गरजेची गोष्ट आहे. त्यामुळे चोरीच्या घटनांना आळा बसू शकतो.
रात्री दरवाजा वाजला तर काय खबरदारी घ्याल?
रात्री-अपरात्री घराचा दरवाजा वाजल्यानंतर सर्व प्रथम लेन्समधून कोण आहे हे पहावे, लेन्स नसेल तर सेफ्टी चेन लॉक लावून फटीतून बघू शकतो. दरवाजा शेजारी असलेल्या खिडकीतून देखील पाहता येते. ओळखीची व्यक्ती असल्याची खात्री करूनच दरवाजा उघडावा.
संकटात ११२ डायल करा
दरवाजावर अनोळखी व्यक्तींची थाप पडल्यानंतर दार उघडताच दागिना हिसकावून पळून जाण्याच्या घटना घडल्या आहेत. आपण राहत असलेल्या परिसरातील स्थानिक पोलिस ठाण्याचा नंबर स्वतःजवळ अवश्य ठेवावा. तातडीच्या मदतीसाठी डायल ११२ वर कॉल करून मदत घेऊ शकतो.
Web Summary : Sangli residents face increasing theft. Verify visitors through door lenses or windows before opening. Install safety chains and CCTV. Contact 112 for emergencies. Stay vigilant!
Web Summary : सांगली में चोरी की बढ़ती घटनाओं के बीच, दरवाजा खोलने से पहले आगंतुकों की जांच करें। सुरक्षा चेन और सीसीटीवी स्थापित करें। आपात स्थिति के लिए 112 पर संपर्क करें। सतर्क रहें!