एड्सग्रस्त माता-पित्यांना जगण्याची उमेद
By Admin | Updated: December 1, 2014 00:07 IST2014-11-30T22:49:03+5:302014-12-01T00:07:09+5:30
आरोग्य विभाग : रत्नागिरीत एचआयव्हीबाधित बालकांची संख्या शुन्यावर--जागतिक एड्स दिन

एड्सग्रस्त माता-पित्यांना जगण्याची उमेद
शोभना कांबळे -रत्नागिरी -एड्स म्हणजे मृत्यू असे समीकरण यापूर्वी मांडले जात होते. मात्र, आता आरोग्य विभागाने काही सेवाभावी संस्था आणि शैक्षणिक संस्था यांच्या सहकार्याने जनजागृतीचे काम प्रभावीपणे झाले आहे. अत्याधुनिक उपचारामुळे आता एचआयव्हीग्रस्त आई-वडिलांचे मूलही भविष्यात एचआयव्हीमुक्त निपजू लागले आहे. रत्नागिरीत तर अशा मातेचे बालक एच. आय. व्ही.ग्रस्त होण्याचे प्रमाण शून्य झाल्याने अशा माता-पित्यांना आता जगण्याची उमेद मिळू लागली आहे.
एड्स रोगाबाबत समाजात अजूनही अनेक गैरसमज आहेत. त्यामुळे यासंदर्भातील चाचणी करून घेण्यास एक प्रकारची भीती असायची. महिला तर आपल्या सर्वच आजारांकडे दुर्लक्ष करीत असतात. मात्र, आता जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण कक्षांतर्गत (ऊ्र२३१्रू३ अ्र२ि ढ१ी५ील्ल३्रङ्मल्ल उङ्मल्ल३१ङ्म’ वल्ल्र३ - ऊअढउव) सुरू असलेले समुपदेशन केंद्र तसेच विविध सामाजिक संस्थांचे जनजागृतीत असलेले योगदान यामुळे ग्रामीण भागातील पुरूष आणि गरोदर महिला या केंद्राच्या चाचणी करण्यास अनुकुलता दाखवू लागल्या आहेत. त्यामुळे जिल्हा रूग्णालयाचे दोन आयसीटीसी विभाग, तीन उपजिल्हा रूग्णालये, उपकेंद्र, ग्रामीण रूग्णालये आणि ६७ प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच १२ खासगी रूग्णालयांच्या सहकार्याने मे २००२ ते आॅक्टोबर २०१४ पर्यंत ८८,९३० पुरूष आणि ७०,३३७ स्त्रिया अशा एकूण १,५९,२६७ नागरिकांनी या चाचणी करून घेतल्या आहेत. विशेष म्हणजे २०११ सालापासून तपासणी करून घेण्यात महिलांची संख्या अधिक आहे.
आतापर्यंत एचआयव्हीग्रस्त माता वा पिता असेल, तर त्याची जगण्याची उमेद संपून जात असे. एड्सचे मृत्यू हेच अंतिम रूप असल्याचे मानले जात असल्याने तो मृत्युच्या भीतीच्या छायेखाली वावरत असे. मात्र, आता पुरेसे प्रबोधन होऊ लागल्याने सुरूवातीला चाचण्या करून घेणाऱ्या नागरिकांच्या संख्येत दरवर्षी वाढ होत असून, त्यामुळे एच. आय. व्ही. बाधितांचे प्रमाण कमी होऊ लागले आहे.
यातील महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे एड्सबाधित किंवा एच. आय. व्ही. बाधित गरोदर माता. कारण या मातेकडून येणाऱ्या अर्भकाला या रोगाची बाधा होऊ शकते. त्यामुळे आरोग्य विभागाने या गरोदर महिलांसाठी गरोदरपणी तसेच तिची प्रसुती आणि त्यानंतर तिचा स्तनपान कालावधी यासाठी विशेष उपचार उपलब्ध करून दिले असल्याने तिचे बाळ निगेटिव्ह होऊ शकते. तसेच ती माताही सहा महिन्यांपर्यंत स्तनपान करू शकते. माता - पिता एच. आय. व्ही. बाधित असेल तरी जन्माला येणारे बालक येथील उपचाराने निरोगी होऊ शकते, हा दिलासा आता एड्सबाधित किंवा एच. आय. व्ही. बाधित माता - पित्यांना मिळू लागला आहे. त्यामुळेच येणारे बाळ निरोगी यावे, या विचाराने गरोदर महिला या चाचण्या करण्यास तयार होऊ लागल्या आहेत. अर्थात याबाबतचे पुरेसे प्रबोधन आरोग्य यंत्रणा आणि स्वयंसेवी संस्थांनी केल्याने अशा मातेचे बाळही एच. आय. व्ही. ग्रस्त होण्याचे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमाण शून्य आहे, हे महत्त्वाचे.
रत्नागिरी जिल्ह्यात जुलै २००३ ते आॅक्टोबर २०१४ या कालावधीत एकूण १,२२,३१५ गरोदर महिलांनी तपासणी करून घेतली. त्यापैकी २६८ महिला (०.२१ टक्के) एच. आय. व्ही. बाधित आढळल्या. या वर्षी तर हे प्रमाण ०.०५ इतके आहे. या काळात १५६ बालकांची एच. आय. व्ही. तपासणी केली असता त्यातील केवळ सहा बालके बाधित होती. हे प्रमाण घटण्याचे प्रमुख कारण म्हणजे या बालकांच्या एच. आय. व्ही.ग्रस्त महिलांना देण्यात आलेल्या प्रतिबंधक ‘नेव्हीरॅपिन’ गोळ्या हे होय. जिल्ह्यात १४ ऐच्छिक सल्ला व चाचणी केंद्र (आयसीटीसी विभाग) आहेत. तसेच ६७ प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि ९ इतर नऊ केंद्रात प्राथमिक चाचणी केली जाते. जिल्हा रूग्णालयात एचआयव्ही बाधितग्रस्तांवर उपचार करणारे केंद्र (ए. आर. टी.) केंद्र असून, दापोली, कामथे, कळंबणी या तीन उपजिल्हा रूग्णालयात आणि राजापूर ग्रामीण रूग्णालय, रत्नागिरीतील उपचार केंद्राशी संलग्न केलेली आहेत.
तसेच १२ खासगी रूग्णालये यांचेही सहकार्य लाभत आहे. याचबरोबर राजापूर येथील प्रकाशयात्री ही सामाजिक स्तरावर कार्य करणारी संस्था (लिंक वर्क्स स्कीम आणि पीपीटीसी) एड्स जनजागृतीसाठी आरोग्य विभागासोबत काम करीत आहे.
आरोग्य विभागाची जनजागृती
आतापर्यंतच्या चाचण्यांमध्ये एच. आय. व्ही.बाधित पुरूष आणि अनुक्रमे स्त्रिया यांची संख्या अनुक्रमे २८८८ आणि २१३७, एकूण ५०२५ (३.४७ टक्के) इतकी आहे. २००२ ते २००४पर्यंत हे प्रमाण ३० टक्क्यापेक्षा जास्त होते. मात्र, आरोग्य विभागाच्या जनजागृती मोहिमेमुळे हे प्रमाण कमी होऊन ते आता साडेतीन टक्क्यांवर आले आहे.
जिल्हा रूग्णालयाच्या एड्स प्रतिबंधक उपचार केंद्रात (आयसीटीसी) मे २००२ ते आॅक्टोबर २०१४ या कालावधीत एच. आय. व्ही. बाधित पुरूषांची संख्या आॅक्टोबर २०१४ पर्यंत एकूण ५३४५ इतकी आहे. त्यापैकी पुरूषांची ३०६९, तर महिलांची संख्या २२७६ इतकी आहे. २००२ साली ३३.६३ टक्क्यांवर असलेली ही संख्या यावर्षी केवळ १.०९ एवढी कमी झाली आहे. जानेवारी ते आॅक्टोबर २०१४ या कालावधीत २३,७०३ जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी एच. आय. व्ही. बाधित केवळ २५९ इतके होते.
गेल्या काही वर्षात रत्नागिरीसारख्या जिल्ह्यात एड्सबाबत जागृती मोठ्या प्रमाणावर झाली आहे. काही वर्षांपूर्वी हा आजार झाल्यावर एक प्रकारची भीती निर्माण झाली होती. मात्र आता याबाबत बऱ्याच प्रमाणावर जागृती करण्यात आली आहे. त्यामुळे सामाजिक मानसिकता बदलली आहे. याचा परिणाम मानसिकता बदलण्यात झाला आहे.
माता - पिता एच. आय. व्ही. बाधित असेल तरी जन्माला येणारे बालक येथील उपचाराने निरोगी होऊ शकते, हा दिलासा आता एड्सबाधित किंवा एच. आय. व्ही. बाधित माता - पित्यांना मिळू लागला आहे. त्यामुळेच येणारे बाळ निरोगी यावे, या विचाराने गरोदर महिला या चाचण्या करण्यास तयार होऊ लागल्या आहेत. महिलांमध्येच एवढ्या प्रमाणावर जागृती झाल्याने आता मुलांमध्ये एड्स होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्याचबरोबर मातेला आजार झाला असल्यास एचआयव्हीग्रस्त महिलेची विशेष काळजी घेतली जात आहे. अशा मातेवर प्रसुतिपूर्व खास उपचार केले जातात. त्यानंतर बाळाचीही विशेष काळजी घेतली जाते.