अधिकाऱ्यालाच राहिले नाही भान.. थुंकून थुंकून कार्यालय केले घाण..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2021 12:12 IST2021-12-11T12:11:07+5:302021-12-11T12:12:06+5:30
सांगली जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात एका कृषी सहायकाने दहशत निर्माण केली आहे. तोंडात २४ तास मावा आणि गुटख्याचा तोबरा भरलेल्या सहायकाने बारनिशी विभाग थुंकून लालेलाल केला आहे.

अधिकाऱ्यालाच राहिले नाही भान.. थुंकून थुंकून कार्यालय केले घाण..!
सांगली : जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात एका कृषी सहायकाने दहशत निर्माण केली आहे. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी गुरुवारी त्याच्याविरोधात आघाडी उघडली. त्यानंतर अधीक्षकांनी कारवाई करत त्याची तडकाफडकी बदली केली. कार्यालयात अस्वच्छतेबद्दल दंड ठोठावला.
कृषी कार्यालयातील ड्युटीपेक्षा अन्य उपद्व्यापामुळे चर्चेत असणारा हा सहायक मुख्यालयातच बसलेला असतो. विजयनगरला मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयातील कृषी अधीक्षक कार्यालयात त्याची दादागिरी चालते. त्याची नियुक्ती अन्यत्र असतानाही अधीक्षक कार्यालयातच मुक्काम ठोकून असतो. कारवाईचा प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्यांना माहिती अधिकाराची भीती दाखवतो. तथाकथित सामाजिक कार्यकर्त्यांना हाताशी धरून अधिकाऱ्यांवर दबाव टाकतो.
तोंडात २४ तास मावा आणि गुटख्याचा तोबरा भरलेल्या सहायकाने बारनिशी विभाग थुंकून लालेलाल केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून शासकीय कार्यालयात स्वच्छता अभियानाचे वारंवार आवाहन केले जात असताना कृषी कार्यालयात मात्र त्याचे अस्वच्छता अभियान सुरू असते. गुरुवारी एका सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्याला घेरले. अस्वच्छतेबद्दल जाब विचारला. मूळ कार्यालय सोडून अधीक्षक कार्यालयात ठिय्या मारल्याबद्दल धारेवर धरले. कार्यालयीन अधीक्षक महिला अधिकाऱ्यानेही तो कृषी सहायक असून, त्याची नियुक्ती अन्यत्र असल्याचे स्पष्ट केले. कार्यकर्त्यांनी धारेवर धरताच त्याची बोबडी वळली. कार्यालयातून काढता पाय घेतला.
दरम्यान, अधीक्षक मनोज वेताळ यांनी गंभीर दखल घेतली. सहायकाची मुख्यालयाकडे तडकाफडकी बदली केली. अस्वच्छतेबद्दल आर्थिक दंडही ठोठावला.
माहिती अधिकाराची दादागिरी
संबंधित कृषी सहायकाने काही तथाकथित माहिती अधिकार कार्यकर्त्यांना हाताशी धरले आहे. एखाद्या अधिकाऱ्याने कारवाईचा प्रयत्न केल्यास कार्यकर्त्यांच्या मदतीने माहिती अधिकाराच्या अर्जांचा भडिमार करतो. त्यामुळे अधिकारीही त्याच्याकडे दुर्लक्ष करतात, अशी माहिती मिळाली.
संबंधित कृषी सहायकाला शिस्तभंगाची नोटीस काढली आहे. मुख्यालयाकडे बदली केली आहे. कार्यालयीन अस्वच्छतेबद्दल आर्थिक दंडही ठोठावला आहे. त्याच्याविषयी तक्रारी आल्यानंतर कडक कारवाई केली असून, कार्यालयीन शिस्तीचा भंग होणार नाही याची काळजी घेतली आहे. - मनोज वेताळ, प्रभारी जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी कार्यालय