महामार्गाचा भराव करताना कृष्णा नदीच्या पाणीपातळीचा तज्ज्ञांमार्फत अभ्यास करावा, अशी मागणी समितीने केली आहे. महापुराच्या काळात आयर्विन पुलाची पाणीपातळी ४९ फुटांवर गेल्यानंतर सांगली ते हरिपूर या नदीपात्रातून वाहणाऱ्या कृष्णा नदी प्रवाह बदलून वाहू लागते. महापुराची पाणीपातळी गाठल्यास संपूर्ण सांगलीतील सिद्धार्थ परिसर ते हरिपूर वेशीपर्यंतचा रस्ता ओलांडून कृष्णा नदी दक्षिण दिशेला वाहू लागते. त्यानंतर पाणी संपूर्ण गावभाग, शामरावनगर, कोल्हापूर रस्त्यावरील आकाशवाणी परिसर या भागातून कृष्णा नदी वाहू लागते. हे पाणी अंकली, इनाम धामणी गाव शिवारातून पुढे अंकली पुलाच्या पलीकडील भागातील निलजी-बामणीजवळ कृष्णा नदीपात्रात पुन्हा मिळते. नदीच्या प्रवाहाच्या तडाख्यात शामरावनगरसह संपूर्ण परिसर येतो. आता महामार्गाचा भराव किंवा संरक्षण भिंत झाल्यास महापुरास तटविले जाणार आहे.
महामार्गाची कामे करताना स्थानिक परिस्थिती पाहून लोकांशी चर्चा करावी. उड्डाण पूल, संरक्षण भिंत, बांधताना कनेक्टिव्हिटीचा विचार करावा. नैसर्गिक ओढे-नाल्यांसाठी पुरेशा रुंद पाईपलाईनची व्यवस्था करावी, यासाठी सर्व ग्रामस्थ महामार्गावर ठिय्या मारणार असल्याचे संघर्ष कृती समितीचे निमंत्रक विठ्ठल पाटील, नामदेवराव मोहिते, सुरेश पाटील, अरविंद तांबवेकर, सुभाष पाटील, अशोक मोहिते, प्रदीप मगदूम, परशुराम कोळी, महावीर पाटील, सुकुमार कुंभार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.