स्वातंत्र्यानंतर प्रथमच लाभला स्थानिक डॉक्टर

By Admin | Updated: August 17, 2014 22:31 IST2014-08-17T21:21:16+5:302014-08-17T22:31:20+5:30

कास परिसर आनंदला : देवकलच्या सचिन अहिरेने दुर्गम भागाला मिळवून दिला सन्मान

After the independence, the first time a qualified local doctor | स्वातंत्र्यानंतर प्रथमच लाभला स्थानिक डॉक्टर

स्वातंत्र्यानंतर प्रथमच लाभला स्थानिक डॉक्टर

स्वातंत्र्यानंतर प्रथमच लाभला स्थानिक डॉक्टर
कास परिसर आनंदला : देवकलच्या सचिन अहिरेने दुर्गम भागाला मिळवून दिला सन्मान
बामणोली : निसर्गाची मुक्त उधळण असूनही अत्यंत खडतर जीवन जगणाऱ्या कास व परिसरातील गावकऱ्यांना दिलासा देण्यासाठी या परिसरातील देवकल गावचा युवक परिस्थितीशी झुंजत डॉक्टर बनला आहे. गरिबीवर मात करणाऱ्या या युवकाने स्थानिकांच्या हालअपेष्टा कमी करण्याचा विडा उचलला आहे.
देवकल (ता. सातारा) येथील सचिन श्रीरंग अहिरे हे या जिद्दी युवकाचे नाव. पेटेश्वर हायस्कूलमध्ये दहावीपर्यंत शिक्षण घेऊन सचिनने सातारला स्थायिक होऊन मोठ्या कष्टाने पुढील शिक्षण घेतले. कास पठार परिसरातील तो पहिला स्थानिक डॉक्टर ठरला आहे.
रंगबिरंगी पुष्पसृष्टीने जगाला भुरळ घालणाऱ्या आणि नैसर्गिक वारसास्थळ ठरलेल्या कास पठार परिसरातील स्थानिक नागरिक मात्र अत्यंत कष्टाचे जीवन जगत आहेत. काससह अनेक गावांमध्ये महिना-महिना वीज गायब असते. एकदा सुरू झालेला पाऊस सलग दोन-तीन महिने कोसळत असतो. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. वाहतूक, वीज, शेती, शिक्षण, आरोग्य या सर्वच पातळ्यांवर समस्याच समस्या आहेत. पावसाळ्यात त्या गंभीर रूप धारण करतात. घाटाईला जाणारी एसटी चोरटाक्यातूनच रस्ता खचल्याने माघारी वळते. धुके, थंडी व मुसळधार पावसाने गेल्या वर्षी अनेक शेतकऱ्यांची जनावरे दगावून गोठे ओस पडले होते. तसेच एका शेतकऱ्याचाही थंडीने गारठून मृत्यू झाला होता. आजही तीच परिस्थिती कायम आहे. अतिवृष्टी आणि जंगली जनावरांमुळे शेतीचे नुकसान होते. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थ शेती सोडून अन्य उद्योगधंद्यांसाठी सातारा, पुणे व मुंबईला स्थलांतरित होतात. या परिस्थितीमुळे गावात फक्त वयोवृद्ध शेतकरी, शिक्षक व विद्यार्थीच शिल्लक राहिले आहेत. रातराणीच्या फुलांप्रमाणे येथील गावे एप्रिल-मे महिन्यात माणसांच्या गर्दीने फुलतात. गावोगावच्या यात्रा या काळात साजऱ्या होतात.
या भूमिपुत्राचा जिल्हा परिषदेचे सदस्य राजू भोसले यांच्या हस्ते पेटेश्वर हायस्कूलमध्ये नुकताच सत्कार करण्यात आला. प्रभो शिवाजीराजे प्रतिष्ठानमार्फत झालेल्या या कार्यक्रमात जादूगार गोरखनाथ जाधव, तुषार शेडगे यांचाही सत्कार करण्यात आला. तसेच प्रतिष्ठानच्या वतीने या कार्यक्रमाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना मोफत वह्या आणि पेनवाटप, गरीब मुलांना गणवेश व शैक्षणिक साहित्य देण्यात आले.
कार्यक्रमास प्रतिष्ठानचे शिवाजी कदम, तानाजी शिंदे, प्रदीप माने, महादेव मोरे, रामचंद्र मोरे, प्रकाश बादापुरे, पेट्रीचे सरपंच शिवाजी माने, माजी सरपंच लक्ष्मण माने, अंकुशराव मोरे, शंकरराव जांभळे, लक्ष्मण गोगावले, सोमनाथ जाधव, अरुण शेडगे, महादेव अहिरे, सखाराम शिंदे, केंद्रप्रमुख गौतम माने, पेटेश्वर हायस्कूलचे मुख्याध्यापक क्षीरसागर व शिक्षक उपस्थित होते. (प्रतिनिधी)

प्रतिकूल परिस्थितीत मिळविले यश
या परिसरात वयोवृद्ध व्यक्ती, आजारी व्यक्ती आणि गरोदर स्त्रियांना आजही डोलीतून मुख्य रस्त्यावर आणावे लागते. शैक्षणिकदृष्ट्या हा भाग मागासलेला असून, पेटेश्वरनगर येथे दहावीपर्यंत शिक्षण देणारी एकमेव शाळा आहे. अकरावीनंतरचे शिक्षण सातारा किंवा मुंबईला जाऊनच करावे लागते. या पार्श्वभूमीवर सचिन अहिरे याने वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून गावाला पहिला डॉक्टर दिला आहे.

Web Title: After the independence, the first time a qualified local doctor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.