विधानसभेनंतर जयंत पाटीलच ‘रेंज’मध्ये
By Admin | Updated: January 3, 2015 00:13 IST2015-01-02T23:20:26+5:302015-01-03T00:13:44+5:30
मिरज पश्चिम भागातील चित्र : बाकीचे ‘आऊट आॅफ कव्हरेज एरिया’

विधानसभेनंतर जयंत पाटीलच ‘रेंज’मध्ये
सोमनाथ डवरी : कसबे डिग्रज :नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत इस्लामपूर मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह विरोधकांनी घेतलेल्या बोटचेप्या भूमिकेमुळे माजी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी एकतर्फी विजय मिळवला. त्यामध्ये त्यांच्या दांडग्या लोकसंपर्काचाही वाटा आहे. आता विजयानंतरही त्यांचा सतत जनसंपर्क आहे, दुसरीकडे मात्र पाच वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले हुतात्मा संकुलाचे नेते वैभव नायकवडी अद्यापही या भागात फिरकलेले नाहीत, तर यंदा निवडणूक लढविणारे, सर्व विरोधकांनी पाठिंबा दिलेले अभिजित पाटील, काँग्रेसचे जितेंद्र पाटील, बी. जी. पाटील ही मंडळीही गायब झाली आहेत.
विधानसभा मतदारसंघ पुनर्रचनेनंतर ग्रामविकासमंत्री म्हणून मिरज पश्चिम भागातील आठ गावांत जयंत पाटील यांनी संपर्कात सातत्य ठेवले. परिसरातील रस्ते, गटारी, कूपनलिका या कामांबरोबरच विविध शासकीय योजना आणण्यासाठी प्रयत्न केले. त्याचप्रमाणे राजारामबापू समूहातील साखर कारखाना, दूध संघ, बँक या संस्थांच्या माध्यमातून विविध कामे करण्यासाठी नियमित प्रयत्नशील राहिले. तथापि परिसरातील पाच गावांसाठीची ‘पुरा’ योजना अद्यापही सुरू नाही. या योजनेच्या प्रक्रियेत बाकी विकासकामे खोळंबल्याचे चित्र आहे. शिवाय सांगली-पेठ राज्यमार्गाचे चौपदरीकरण रखडले आहे. कसबे डिग्रज-मौजे डिग्रज पुलाच्या कामाचीही प्रतीक्षा आहे.
असे असले तरी दु:खद घटनेवेळी संबंधितांची भेट घेणे, लग्नसमारंभास हजेरी लावणे आदी जनसंपर्काची कामे जयंत पाटील आवर्जून करतात. विधानसभेच्या निवडणुकीनंतर तुंग, सावळवाडी, दुधगाव, कसबे डिग्रज येथे कार्यक्रम घेण्यात आले. कवठेपिरानमधील हिंदकेसरी मारुती माने यांच्या स्मारकाच्या कामास प्रारंभ झाला. यातून जयंत पाटील कायम लोकसंपर्कात असल्याचे दिसते.
दुसरीकडे मात्र गत विधानसभेनंतर वैभव नायकवडी या भागात फिरकले नसल्याचे चित्र आहे. हुतात्मा साखर कारखान्यास सर्वसामान्यांचा किती ऊस नेला जातो?, असा प्रश्न विचारला जात आहे.
‘स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी कोठे आहेत?’, असा ‘मेसेज’ व्हॉटस् अपवर फिरत आहे. सोबतीला ‘सदाभाऊंचा बंगला किती मोठा झाला?’ अशीही चर्चा सुरू आहे. काँग्रेसचे अभिजित पाटील या भागातील काँग्रेस मतदारांची भेट घेण्यासाठीही आले नाहीत. शिवाय जितेंद्र पाटील आणि बी. जी. पाटील कोठे गायब झाले?, असा सवाल केला जात आहे. शेतकऱ्यांचे प्रश्नही जैसे थेच आहेत.