विट्यात मोटारसायकल चोरट्याला अटक, एलसीबीची कारवाई : दोन गाड्या जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 18:36 IST2018-08-22T18:34:08+5:302018-08-22T18:36:08+5:30
विटा बसस्थानक परिसरात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मंगळवारी मोटारसायकल चोरट्याला अटक केली. आकाश अशोक बुधावले (वय १९, रा. कलेढोण, ता. खटाव, जि. सातारा) असे चोरट्याचे नाव आहे.

विट्यात मोटारसायकल चोरट्याला अटक, एलसीबीची कारवाई : दोन गाड्या जप्त
सांगली : विटा बसस्थानक परिसरात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मंगळवारी मोटारसायकल चोरट्याला अटक केली. आकाश अशोक बुधावले (वय १९, रा. कलेढोण, ता. खटाव, जि. सातारा) असे चोरट्याचे नाव आहे. त्याच्याकडून दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, अप्पर अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी जिल्ह्यातील मोटारसायकल चोरी, जबरी चोरी, घरफोडी, दरोड्याच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पेट्रोलिंग करून रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला दिले होते. गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात विविध पथके नियुक्त करून पेट्रोलिंगचे काम सुरू आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषणचे उपनिरीक्षक प्रदीप चौधरी, कर्मचारी उदय साळुंखे, अनिल कोळेकर, सागर टिगरे हे खासगी वाहनातून रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी करीत असताना, खबऱ्यामार्फत कलेढोण येथील आकाश बुधावले हा विनाक्रमांकाची मोटारसायकल वापरत असल्याची माहिती मिळाली. तो विटा येथील बस स्थानकावर येणार असल्याचे समजताच पथकाने सापळा रचला. आकाश हा मोटारसायकलवरून बसस्थानक परिसरात येताच पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील मोटारसायकलीबाबत चौकशी करता, तो समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. त्याची सखोल चौकशी केल्यानंतर त्याने, आटपाडी येथून दोन मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली. या दोन्ही मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून बुधावले याला पुढील तपासासाठी आटपाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.