परवानगीशिवाय केले गर्भपात
By Admin | Updated: August 22, 2014 00:53 IST2014-08-22T00:42:08+5:302014-08-22T00:53:11+5:30
वर्षा देशपांडे : सांगलीत रुग्णालयासमोर निदर्शने

परवानगीशिवाय केले गर्भपात
सांगली : येथील आंबेडकर रस्त्यावरील श्री मॅटर्निटी अँड सर्जिकल हॉस्पिटलचे डॉ. अर्जुन पाटील व त्यांच्या पत्नी सुषमा पाटील यांनी १०७ महिलांचा केलेला गर्भपात हा खुनासारखा गंभीर गुन्हा असून, त्यांच्याकडून पुरावे नष्ट होण्याची भीती असल्याने तातडीने अटक करावी, अशी मागणी गर्भलिंगनिदान राष्ट्रीय मूल्यमापन समितीच्या सदस्या व महिला लोक आयोगाच्या कार्याध्यक्षा अॅड. वर्षा देशपांडे यांनी पत्रकारांशी बोलताना केली. शासकीय दोन डॉक्टरांच्या परवानगीशिवाय पाटील दाम्पत्याने हे गर्भपात केले आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
देशपांडे म्हणाल्या की, अर्जुन पाटील हे शासकीय रुग्णालयात सेवा करतात. तेथील अनेक औषधे त्यांच्या हॉस्पिटलमध्ये सापडली आहेत. काही औषधांची मुदत संपलेली आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. त्यांनी गर्भधारणा प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन केले आहे. पाटील दाम्पत्याने केलेले १०७ गर्भपात कधी व कसे केले? याचा उलगडा होणे गरजेचे आहे. गर्भपात केल्यानंतर अर्भक कुठे दफन केले? याचे रहस्य पोलिसांनी उलगडावे.
अन्न व औषध प्रशासन विभागाने या हॉस्पिटलच्या परिसरातील औषध दुकानावर छापे टाकून औषधांची तपासणी करावी. गर्भपात करण्यासाठी शासकीय दोन
डॉक्टरांची परवानगी घ्यावी लागते. मात्र तसे या प्रकरणात घडले नाही. सर्व गर्भपात हे बेकायदेशीरपणे केले आहेत.
दरम्यान, देशपांडे यांनी हॉस्पिटलसमोर निदर्शनेही केली. त्यांच्यासोबत शाहीन शेख, सुरेखा शेख, विद्या स्वामी, स्नेहा सुतार, रुक्साना काझी, अॅड. दत्तात्रय जाधव, अॅड. शैलाताई जाधव होते. शहर पोलीस ठाण्यासमोरही त्यांनी निदर्शने केली. त्यानंतर पोलिसांकडून तपासाची माहिती घेऊन त्यांना मार्गदर्शक सूचनाही देशपांडे यांनी केल्या.
दरम्यान, पोलिसांनी डॉ. अर्जुन पाटील यांच्याकडे दिवसभर चौकशी केली. त्यांनी गर्भपात करण्यासाठी शासकीय मान्यता असल्याचे पुरावे सादर केले आहेत. (प्रतिनिधी)