पलूस : येरळा नदीकाठावर मोराळ (ता. पलूस) येथील आंधळी-निंबळक बंधाऱ्याखाली मंगळवारी फिरायला गेलेल्या तीघा मित्रांमधील साईप्रसाद समाधान कदम (वय २३, सध्या रा. पलूस, मुळ गाव : मोराळे) हा नदीतील पाण्याच्या प्रवाहात वहावून गेला होता. त्याचा मृतदेह रात्री १ नंतर उशिरा सापडला. साईप्रसादला नदीकाठी सेल्फीचा मोह आवरला नाही. सेल्फी काढताना शेवाळावरुन पाय घसरुन तो नदीच्या प्रवाहात पडला होता.
याबाबत घटना स्थळावरून मिळालेली माहिती अशी, साईप्रसाद हा त्याच्या दोन मित्रांसोबत नदीकाठावर फिरायला गेला होता. साईप्रसादचा नदीमधील शेवाळावरून पाय घसरला तो पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत गेला. साईप्रसादला पोहता येत नव्हते. दोन मित्रांनाही पोहता येत नसल्याने त्यांना साईप्रसादला वाचवता आले नाही. रात्री उशिरापर्यंत आपत्कालीन बचाव पथकाचा शोध चालू होता. नदीतील शेवाळ व रात्रीचा अंधार यामुळे अनेक अडथळ्यांची शर्यत पार करून बचाव पथकाने तब्बल तीन तासाच्या परिश्रमाने साईप्रसादचा मृतदेह शोधून काढला. शोधकार्यासाठी गावातील नागरिकांसह पोलिस व बचाव पथकाचे कमांडर कैलास वडर, महेश गवाणे, कृष्णा हेगडे, आसिफ मकानदार, इर्शाद कवठेकर, सागर जाधव यांनी परिश्रम घेतले.
पलूस पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह नातलगांच्या स्वाधीन केला. मृतदेह पाहताच साईप्रसादची पत्नी व कुटुंबायांनी केलेला आक्रोश मन हेलावणारा होता.
सहा महिन्यापूर्वी झाला होता विवाह
अवघ्या सहा महिन्यापूर्वीच साईप्रसादचा विवाह झाला होता. नव्या संसाराच्या सुखी स्वप्नांचे चांदणे अजून घरात असतानाच ते अचानक या घटनेने विझले. पत्नीसह साईप्रसादच्या कुटुंबीयांना, सोबत गेलेल्या मित्रांना या दुर्घटनेने मोठा धक्का बसला.
Web Summary : A 23-year-old man drowned in the Yerala River near Moral while taking a selfie. He slipped on algae and was swept away. His body was recovered after a three-hour search. The victim was married six months ago.
Web Summary : येरला नदी में सेल्फी लेते समय 23 वर्षीय युवक डूब गया। शैवाल पर फिसलने से वह बह गया। तीन घंटे की खोज के बाद उसका शव बरामद किया गया। पीड़ित की शादी छह महीने पहले हुई थी।