सांगली : बॅकखाते नियमीत सुरु ठेवण्यासाठी केवायसी अपडेट करणे आवश्यक असल्याचे सांगत एकाने महिलेला पाच लाख रुपयांचा गंडा घातला. याप्रकरणी अश्विनी काका शिंदे (रा. प्लॉट नं २२, जासूद मळा, बायपास, माधवनगर रस्ता सांगली) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.बँकेतून बोलत असल्याचे सांगत फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. बँक तसेच सायबर पोलिसांकडून याबाबत वारंवार सतर्क राहण्याच्या सूचना देऊनही अनेकजणांची फसवणूक होत आहे.फिर्यादी अश्विनी शिंदे यांना त्यांच्या मोबाईल क्रमांकावर एका व्यक्तीने कॉल करत बँकखाते सुरु राहण्यासाठी केवायसी अपडेट करणे आवश्यक असल्याचे सांगितले. बँकेतून फोन आल्याचे वाटल्याने शिंदे यांनीही आपली माहिती त्या व्यक्तीला दिली.यानंतर काही वेळातच फिर्यादी शिंदे यांना काही संदेश आले. त्यानुसार शिंदे यांच्या खात्यातील पाच लाखांची रक्कम ऑनलाईनच्या माध्यमातून परस्पर काढून घेण्यात आली होती. याबाबत त्यांनाही थोड्यावेळाने बँक खात्यातून पैसे काढण्यात आल्याचे लक्षात आले यानंतर त्यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
केवायसीच्या बहाण्याने सांगलीतील महिलेस पाच लाखांचा गंडा
By शरद जाधव | Updated: October 3, 2023 17:44 IST