विहीरीचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी ४ हजार, आळतेच्या ग्रामसेवकाला लाच घेताना रंगेहाथ पकडले!
By घनशाम नवाथे | Updated: June 19, 2025 21:33 IST2025-06-19T21:32:44+5:302025-06-19T21:33:38+5:30
मुजावर याला लाच घेताना रंगेहाथ पकडल्यानंतर सायंकाळी घर झडतीची घेण्यात आली. तसेच तासगाव पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.

विहीरीचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी ४ हजार, आळतेच्या ग्रामसेवकाला लाच घेताना रंगेहाथ पकडले!
राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून विहिर खुदाईचा प्रस्ताव पाठवून तो पूर्ण करेपर्यंत मदत करण्यासाठी ४ हजार रूपयांची लाच घेताना आळते (ता. तासगाव) येथील ग्रामसेवक आलिम यासीन मुजावर (वय ३८, रा. तासगाव) याला रंगेहाथ पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरूवारी दुपारी ही कारवाई केली.
तक्रारदार हे आळते येथील शेतकरी आहेत. त्यांच्या वडिलांचे नावे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजनेअंतर्गत विहीर मंजूर आहे. विहीर खुदाई प्रकल्प प्रस्तावाचा प्राथमिक मागणी प्रस्ताव पाठविण्यासाठी तक्रारदार हे पाठपुरावा करत होते. तेव्हा प्रस्ताव पाठवून कार्यारंभ आदेश काढण्यासाठी तसेच प्रस्तावाची पुढील मस्टर मागणीसाठी, प्रस्ताव पूर्ण होईपर्यंत मदत करतो असे सांगून ग्रामसेवक मुजावर याने ५ हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यामुळे तक्रारदार यांनी
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पथकाने दि. १९ रोजी ग्रामपंचायत कार्यालयसमोरील आवारात पडताळणी केली. तेव्हा ग्रामसेवक मुजावर याने ४ हजार रुपये लाचेची मागणी करून रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानुसार पथकाने सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून ४ हजार रूपये लाचेची मागणी करून पंचासमक्ष रक्कम स्विकारल्यानंतर मुजावर याला रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच्याकडून लाचेची रक्कम ४ हजार रुपये, मोबाईल, इत्यादी वस्तू ताब्यात घेण्यात आल्या आहेत.
मुजावर याला लाच घेताना रंगेहाथ पकडल्यानंतर सायंकाळी घर झडतीची घेण्यात आली. तसेच तासगाव पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. लाचखोर मुजावर याला शुक्रवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.
पोलिस उपअधीक्षक अनिल कटके, निरीक्षक किशोरकुमार खाडे, अंमलदार प्रीतम चौगुले, अजित पाटील, रजपूत आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
लाचखोरीची तालुक्यात चर्चा
गतवर्षी तासगाव तालुक्यात सात हजाराची लाच घेताना मंडल अधिकाऱ्यासह तिघांना अटक केली होती. त्यानंतर तालुक्यात ग्रामसेवकाला लाच घेताना अटक केल्यानंतर महसूल विभागातील लाचखोरीची चर्चा सर्वत्र रंगली होती.