रेठरे धरण : वाघवाडी (ता. वाळवा) येथील सरदार व रोमन या बैलजोडीने पुसेगाव (जि. सातारा) येथील राज्यस्तरीय मैदानात विजेच्या वेगाने धावत विजेतेपद पटकावले. दोन लाख सत्याहत्तर रुपये व ढाल व हिंदकेसरीचा मानाचा किताब या जोडीने पटकावला. या विजयाने रोमन व सरदार ही नवखी जोडी महाराष्ट्रात प्रसिद्ध झाली.पुसेगाव (ता. खटाव) येथे बैलगाडी शर्यती आयोजित केल्या होत्या. शर्यतीत महाराष्ट्रातून १२०० बैलजोड्या सहभागी झाल्या होत्या. शेवटच्या टप्प्यात वेगाने अंतर कापत सरदार व रोमन या बैलजोडीने पुसेगाव हिंदकेसरीवर आपले नाव कोरले. वाघवाडी येथील गरीब कुटुंबातील सरदार या बैलाचे मालक आदित्य महादेव लाड व सुधीर वाघ ऊर्फ बंडा ड्रायव्हर असून रोमन या बैलाचे मालक प्रमोद वाघ, शरद लाड व उदय वाघ व बजरंग वाघ आहेत. या शेतकऱ्यांच्या दावणीला गेल्या अनेक वर्षांपासून बैलांची जोपासना केली जाते. सरदार बैलाचा मालक आदित्य व रोमन बैलाचा मालक प्रमोद हे तर नवखे तरुण आहेत, तर बारक्या ड्रायव्हर सुरूल यांनी ही बैलगाडी पळविली. पुसेगाव मैदानात सरदार व रोमन बैलजोडी विजेती ठरल्यानंतर वाळवा तालुक्यातील व वाघवाडीच्या बैलगाडी शौकिनांनी जल्लोष साजरा केला. वाघवाडी येथे डीजेच्या वाद्यांमध्ये बैलांची मिरवणूक काढली.
सरदार व रोमन या दुशी असणाऱ्या बैलजोडीने कमी वयात खुल्या गटात सहभागी होत मोठे यश संपादन केले असून, त्यांच्या पाठीवर गुलाल व कौतुकाची थाप टाकत आम्ही जल्लोष साजरा केला.- आदित्य लाड, सरदार बैलाचे मालक.
वर्षभरापूर्वी मैदानात उतरणाऱ्या रोमन व सरदार या बैलजोडीचा पहिल्या दहा क्रमांकात नंबर येईल, एवढीच आमची आशा होती. परंतु अटीतटीच्या लढतीत या बैलजोडीने निकालरेषा गाठत हिंदकेसरी किताब मिळविल्याने आम्ही आनंदी आहोत.- प्रमोद वाघ, रोमन बैलाचे मालक.
दीड वर्षापूर्वी सरदार व रोमन हे बैल खरेदी केले होते, त्यांना दररोज डाळ व गहू आट्टा खुराक तसेच नियमित वैरण व पाच दिवसांतून एकदा पळण्याचा सराव, कसरत घेत त्यांना स्पर्धेसाठी तयार केले आहे. -सुधीर वाघ.