आष्टा : नौदलात भरतीचे आमिष दाखवून ६ युवकांची ३० लाख रुपयांची फसवणूक करणारा तोतया नौदल अधिकारी आकाश काशिनाथ डांगे (वय २३, रा. पाडळी बुद्रुक, ता. फलटण) याने आष्टा पोलीस ठाण्यातील कोठडीत नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी सायंकाळी ५ वाजता घडली.बहादूरवाडी येथील नितीन दळवी याच्यासह सहा युवकांना नौदलात भरतीचे आमिष दाखवून आकाश डांगे याने प्रत्येकी पाच लाख याप्रमाणे तीस लाख रुपये घेतले होते. संबंधितांना बोगस नियुक्तीपत्रेही दिली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या युवकांनी त्याच्याकडे पैशासाठी तगादा लावला. यानंतर त्याने या युवकांना धनादेश दिला; मात्र तो वटला नाही. त्यामुळे संबंधित युवकांनी आष्टा पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दिली होती. यानंतर आष्टा पोलिसांनी आकाश डांगे याला शनिवारी रात्री उशिरा अटक केली.रविवारी सकाळी ११ वाजता त्याला इस्लामपूर न्यायालयासमोर उभे करण्यात आले. न्यायालयाने त्याला २५ नोव्हेंबरअखेर पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. त्यानुसार त्याची रवानगी आष्टा पोलिस ठाण्यात करण्यात आली. सायंकाळी चार ते पाचच्या दरम्यान आकाशने हातावर ब्लेडसारख्या हत्याराने कापून घेऊन नायलॉनच्या दोरीने गळफास घेण्याचा प्रयत्न केला. सायंकाळी ७ वाजता हा प्रकार पोलिसांच्या लक्षात आला. त्यांनी तत्काळ त्याला आष्टा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्याला सांगलीच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले.घटनेची माहिती मिळताच आष्टा पोलीस ठाण्यासमोर मोठी गर्दी झाली होती. रात्री नऊ वाजता इस्लामपूरचे उपविभागीय अधिकारी अशोक वीरकर यांनी पोलिस ठाण्यास भेट देऊन घटनेची माहिती घेतली. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक मनमित राऊत करीत आहेत.
तोतया नौदल अधिकाऱ्याचा आष्ट्यात पोलिस कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न, सांगलीत उपचार सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2022 16:09 IST