आटपाडी: आटपाडी तालुक्यातील जांभुळणी येथील वन विभागाचे क्षेत्र आणि काही शेतकऱ्यांच्या शेतातील वैरण व गवताला शनिवारी रात्री लागलेल्या आगीत सुमारे ७५ हेक्टर क्षेत्रावरील विविध प्रकारची लहान-मोठी झाडे-झुडपे आणि विविध प्रकारची वनसंपदा जळून खाक झाली. दरम्यान आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.यावर्षी आटपाडी तालुक्यात माळरानावावर आगीच्या घटनेत वाढ झाल्याचे पहायला मिळाले असून अनेक ठिकाणी शेतकरी, शेतातील बांध पेटवताना आग पसरल्याने नुकसान झाले. काही ठिकाणी नजरचुकीने गवत पेटल्याने आगीची घटना घडली आहे. जांभुळणी येथे शनिवारी रात्री सात वाजता अचानक धुराचे लोट येताना लोकांना दिसले. तेथे वड, पिंपळ, पिंपरणी, करंज, लिंब, बोर, खैर, बाभूळ अशी विविध प्रकारची हजारो झाडे आहेत. ग्रामपंचायतीनेही येथे मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केले होते. पाच वर्षांपासून पावसाचे प्रमाण वाढल्यामुळे झाडांची वाढ चांगली झाली. उन्हाळ्यामुळे वनीकरणातील गवत पूर्ण वाळून गेले होते. शनिवारी रात्री डोंगरातील वनातून आग, धूर गावकऱ्यांना दिसले. गावकऱ्यांनी आटपाडी वन विभागाशी संपर्क साधला. मात्र, एकाही कर्मचाऱ्याने गावकऱ्यांचे फोन घेतले नाहीत. तरुणांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला. आग विझवण्यासाठी तरुण मोठ्या संख्येने डोंगरावर गेले. आगीने रौद्ररूप धारण केले होते. संपूर्ण वनक्षेत्रात चारही बाजूंनी आग पसरली. अंदाजे ७५ ते १०० हेक्टर क्षेत्रावरील विविध प्रकारची झाडे, झुडपे, गवत पूर्ण जळून खाक झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी आग आटोक्यात आली.
Sangli: जांभुळणीत वनविभागाच्या ७५ हेक्टरवरील क्षेत्राला भीषण आग, वनसंपदा जळून खाक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 20:18 IST