तासगाव : मांजर्डे (ता. तासगाव) येथे अनिता पोपट मोहिते या अंदाजे ५० वर्षीय महिलेचा डोक्यावर वार करून खून झाल्याची घटना गुरुवारी (दि.७) रात्री उशिरा उघडकीस आली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.याबाबत अधिक माहिती अशी, मांजर्डे येथे गावापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या बाराआंबा परिसरात अनिता मोहिते या एकट्याच राहण्यासाठी होत्या. आजूबाजूला लोक वस्ती नव्हती. त्यांच्या पतीचे बऱ्याच वर्षांपूर्वी निधन झाले आहे. त्यांना मुलगी असून ती मुंबई येथे वास्तव्यास आहे.फोनवरून आईशी संपर्क होत नसल्याने मुलीने नात्यातील एका तरुणास याबाबत सांगितले. त्यानंतर गुरुवारी रात्री संबंधित तरुण अनिता मोहिते यांच्या घरी गेला. त्यावेळी घरात अनिता मोहिते या मृतावस्थेत पडलेल्या दिसून आल्या. त्यांच्या डोक्यावर गंभीर जखमा होत्या. त्यामुळे डोक्यावर वार करून त्यांचा खून झाल्याची चर्चा घटनास्थळी आहे. घटनास्थळी दुर्गंधी पसरली असल्यामुळे दोन दिवसांपूर्वीच त्यांचा घातपात झाला असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. या घटनेची माहिती तत्काळ पोलिसांना कळविण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळावर धाव घेतली. खून झाल्याची चर्चेने घटनास्थळावर रात्री गावातील नागरिकांनी गर्दी केली होती. पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू होती.
Sangli Crime: मांजर्डेत डोक्यावर वार करून एकाकी महिलेचा खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 11:44 IST