सांगली : दक्षिण भारत जैन सभेच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून सांगलीत रविवारी झालेल्या सभेत प्रचंड गदारोळात पार पडली. निवडीवरून आमदार प्रकाश आवाडे व आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर गट आमने-सामने आले. एकमेकाच्या अंगावर धावून जाण्याचा प्रसंग घडला. खुर्च्या फेकाफेकीचे प्रकारही घडले.दरम्यान, बहुमताने सभेत भालचंद्र पाटील यांची अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली. या निवडीनंतर काही सदस्यांनी सभा त्याग करत समांतर सभा घेत प्रा. डी. ए. पाटील यांची अध्यक्षपदी निवड केली.दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील-बोरगावकर यांच्या निधनानंतर भालचंद्र पाटील यांची हंगामी अध्यक्षपदी निवड झाली होती. दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्षपदाच्या निवडीसाठी सांगलीतील दिगंबर जैन बोर्डिंग येथे रविवारी मध्यवर्ती कार्यकारिणी मंडळाची बैठक झाली. या बैठकीत अध्यक्षपदासाठी यड्रावकर गटाकडून विद्यमान अध्यक्ष भालचंद्र पाटील आणि आवाडे गटाकडून दक्षिण भारत जैन सभेचे माजी चेअरमन डी. ए. पाटील यांनी अर्ज भरले होते.या निवडीत उपस्थित ७२ पैकी ६८ सदस्यांनी पाटील यांच्या नावाला अनुमोदन दिले. चार सदस्यांनी विरोध नोंदवला. निवडीनंतर विरोधी गटातील काहींनी सभेच्या मध्यवर्ती कार्यालयात घुसून राडा करण्याचा प्रयत्न केला. फलक फाडले. ‘माजी चेअरमन डी. ए. पाटील यांना अध्यक्ष करा,’ अशी मागणी करत त्यांनी गोंधळ घातला. सभापत्रिकावर अध्यक्ष निवडीकरिता भालचंद्र पाटील यांचे नाव घोषित केल्यानंतर संजय कणेरे यांनी अध्यक्ष पदाकरिता अन्य कोणी अर्ज केले आहेत, त्यांची नावे विषय पटलावर घेण्यात यावे, असे सुचविले; पण अभिनंदन पाटील यांनी भालचंद्र पाटील यांच्या नावाची अध्यक्ष म्हणून घोषणा केली. भालचंद्र पाटील यांचे नाव जाहीर होताच बाहेर उभे असलेले दोन्ही गटांचे समर्थक सभागृहात घुसले. यामुळे सभागृहात गोंधळ उडाला. एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रसंग घडला.या झोंबाझोंबीत जवाहर कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील व सुनील पाटील यांचे कपडे फाटले. यामुळे गोंधळात आणखीन भर पडत नेमके कोण कोणाच्या अंगावर धावून जात आहे, हे दोन्ही गटांना समजत नव्हते. खुर्च्या एकमेकांच्या अंगावर फेकण्याचा प्रकार झाला. दरम्यान, सभागृहात पोलिसांनी सौम्य लाठीमार करत सदस्यांना पांगविण्याचा प्रयत्न करत प्रोसेडिंग जप्त केले.
खुर्च्या आपटल्या, फलकही फाडलाबैठक संपल्यानंतर काही मंडळी सभेच्या कार्यालयात घुसले. त्यांनी खुर्च्या आपटल्या. फोटो फेकण्याचा प्रयत्न केला. सभेचा फलक काढला. अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे बाचाबाची झाली. याची कुठेही नोंद झाली नाही.