जिल्ह्याचा दहावीचा ९९.९४ टक्के निकाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:21 IST2021-07-17T04:21:45+5:302021-07-17T04:21:45+5:30
सांगली : जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९९.९४ टक्के लागला. कोल्हापूर विभागात सांगली अव्वल असून, जिल्ह्यातील ३९ हजार ६३१ विद्यार्थ्यांचे अंतर्गत ...

जिल्ह्याचा दहावीचा ९९.९४ टक्के निकाल
सांगली : जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९९.९४ टक्के लागला. कोल्हापूर विभागात सांगली अव्वल असून, जिल्ह्यातील ३९ हजार ६३१ विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यांकन केले असून त्यापैकी ३९ हजार ६११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यंदा मात्र मुलींपेक्षा मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण जास्त आहे.
राज्यात कोरोनाची लाट असल्याने दहावीच्या विद्यार्थ्यांच्या लेखी परीक्षा घेता आली नाही. अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल जाहीर केला. बोर्डाच्या संकेतस्थळावर निकाल पहाता न आल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली. यंदा टक्केवारीत अडीच टक्क्यांनी वाढ झाली. कोल्हापूर विभागात सांगली जिल्ह्याचा सर्वाधिक ९९.९४ टक्के निकाल लागला.
जिल्ह्यातील ६४९ शाळांतील ३९ हजार ६३१ विद्यार्थ्यांची परीक्षेसाठी नोंदणी झाली होती. त्यापैकी ३९ हजार ६३१ विद्यार्थ्यांचे मूल्यांकन झाले. नववी आणि दहावीतील अभ्यासक्रमांच्या आधारे अंतर्गत मूल्यमापनानुसार ३९ हजार ६११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मागील काही वर्षांपासून दहावीच्या निकालात मुलांपेक्षा मुली आघाडीवर होत्या. मात्र, यंदा मुलांनी बाजी मारल्याचे अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे जाहीर झाले. जिल्ह्यातील २१ हजार ७०१ मुलांपैकी २१ हजार ६९३ उत्तीर्ण झाले. त्याचे प्रमाण ९९.९६ टक्के आहे. १७ हजार ९३० मुलींपैकी १७ हजार ९१८ उत्तीर्ण झाले. मुलींची पास होण्याचे टक्केवारी ९०.९३ टक्के आहे.
चौकट
पुनर्परीक्षार्थीचा निकाल ८४.९४ टक्के
जिल्ह्यातून २८६७ पुनर्परीक्षार्थीची नोंदणी झाली होती. त्यापैकी १४४१ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यातील १४४१ विद्यार्थ्यांचे मूल्यांकन केले असून १२२४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालाची टक्केवारी ८४.९४ आहे.
चौकट
असे केले मूल्यमापन
दहावीच्या निकालासाठी १०० टक्के गुणांपैकी ५० टक्के गुण दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनावर तर ५० टक्के गुण नववीच्या अंतिम परीक्षेच्या गुणांना देऊन अंतर्गत मूल्यमापन केले आहे. विद्यार्थ्यांचे प्रत्येक विषयाचे शंभर गुणांचे मूल्यमापन केले. अंतर्गत मूल्यमापनासाठी ३० टक्के गुण, प्रात्यक्षिकांसाठी २० गुण आणि नववीत मिळालेल्या गुणांसाठी ५० टक्क्यांनुसार मूल्यमापन करून दहावीवा निकाल जाहीर केला आहे.