९३ हजार कुटुंबं जातात उघड्यावर शौचाला!
By Admin | Updated: April 5, 2015 00:05 IST2015-04-05T00:03:24+5:302015-04-05T00:05:38+5:30
शौचालयांबाबत अनास्था : उद्दिष्टपूर्तीसाठी जिल्हा परिषदेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची धावपळ

९३ हजार कुटुंबं जातात उघड्यावर शौचाला!
अशोक डोंबाळे ल्ल सांगली
जिल्ह्यातील ९३ हजार ८०४ कुटुंबांकडे अजूनही शौचालय नसल्याने ते उघड्यावर शौचास जात असल्याचे विदारक चित्र पुढे आले आहे. गेल्या चार वर्षांत ७०४ गावांपैकी ४७५ गावे शंभर टक्के निर्मल झाली असून, २२९ गावे निर्मलग्राम करण्यासाठी स्थानिक आणि जिल्हा प्रशासनाकडून फारसे प्रयत्न होताना दिसत नाहीत.
केंद्र व राज्य शासनाच्या पुढाकाराने स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) हा राष्ट्रीय कार्यक्रम २ आॅक्टोबरपासून देशभरात सुरू करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील प्रत्येकाच्या घरी शौचालय असणे, त्याचा निरंतर वापर करणे असे चित्र निर्माण करण्यासाठी देशात स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात झाली आहे. यासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत अनुदान दिले जाते, मात्र महागाई लक्षात घेता शासनाचे अनुदान अत्यल्प आहे. त्यामुळे या उपक्रमाला पाहिजे तेवढे यश मिळाले नसल्याचे वास्तव आहे. जिल्हा परिषदेमार्फत करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यातील ३ लाख ८१ हजार ८५६ कुटुंबांंपैकी २ लाख ८८ हजार ५२ कुटुंबे शौचालयाचा वापर करीत आहेत. पलूस तालुका शंभर टक्के शौचालययुक्त झाला असून, खानापूर तालुक्यातील एक गाव सोडल्यास अन्य गावे निर्मलग्राम झाल्याचा फेब्रुवारी २०१५ चा अहवाल आहे.
या अहवालानुसार जिल्ह्यातील ९३ हजार ८०४ कुटुंबांकडे शौचालय नसल्याची बाब समोर आली आहे. जिल्ह्यातील ३ लाख ८१ हजार ८५६ कुटुंबांपैकी वाळवा तालुक्यात सर्वाधिक ५२ हजार ८५८ कुटुंबांकडे शौचालय असून, आटपाडी तालुक्यात सर्वात कमी शौचालये आढळून आली. या तालुक्यात केवळ १७ हजार ९० कुटुंबांकडे शौचालय आहे. येथील आठ हजार ३४६ कुटुंबाकडे शौचालय नसल्याने ते उघड्यावर शौचास जात आहेत. ग्रामीण व शहरी भागाकरिता शौचालययुक्त गाव ही संकल्पना १०० टक्के अमलात आणण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून २ आॅक्टोबर २०१९ पर्यंतचे ध्येय समोर ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यातील सध्याची स्थिती लक्षात घेता, यासाठी शासन व प्रशासनाला कसरत करावी लागणार आहे. यासाठी जनजागृतीची गरज आहे. २०१७-१८ पर्यंत जिल्हा शंभर टक्के शौचालययुक्त करण्याचे उद्दिष्ट पाणी व स्वच्छता अभियान कक्षाने ठेवले आहे. सध्याची गती पहाता ते पूर्ण होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.