दुदनकर हॉस्पिटलमध्ये ८० कोरोना रुग्णांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:32 IST2021-07-07T04:32:49+5:302021-07-07T04:32:49+5:30
सांगली : शहरातील दुदनकर हॉस्पिटलमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत २५०हून अधिक रुग्ण दाखल झाले होते. यातील ८०पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू ...

दुदनकर हॉस्पिटलमध्ये ८० कोरोना रुग्णांचा मृत्यू
सांगली : शहरातील दुदनकर हॉस्पिटलमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत २५०हून अधिक रुग्ण दाखल झाले होते. यातील ८०पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूला डॉ. महेश दुदनकर यांच्यासह रुग्णालयातील डॉक्टर जबाबदार आहेत. महापलिकेने कोविड हॉस्पिटल म्हणून या रुग्णालयाला परवानगी देताना नियमांना बगल दिली आहे. त्यामुळे दुदनकर यांच्यासह आयुक्त, आरोग्य अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी माजी नगरसेवक युवराज गायकवाड यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.
येत्या आठ दिवसात कारवाई न झाल्यास १२ जुलैपासून महापालिकेसमोर उपोषण सुरु करण्याचा इशारा त्यांनी दिला. गायकवाड म्हणाले, कोरोना रुग्णांची लूट करणाऱ्यात ‘ॲपेक्स’मधील डॉ. महेश जाधव हे एकटेच नाहीत तर किमान चार ते पाच रुग्णालये आहेत. त्यांची चौकशी झाली पाहिजे. दुदनकर हॉस्पिटलची माहिती महापालिका प्रशासनाकडे अनेकवेळा मागितली, मात्र ती मिळाली नाही. डॉ. दुदधनकर दातांचे डॉक्टर आहेत, तरीही त्यांना कोरोना रुग्णांवर उपचार करण्यास महापालिकेने परवानगी दिली. हॉस्पिटलमधील इतर डॉक्टरही कान, नाक, घसा तज्ज्ञ व अन्य वैद्यकीय शाखेतील आहे. यातील कोणीही छाती रोग, फुफ्फुस, यकृतावरील तज्ज्ञ नाहीत.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत या हॉस्पिटलमधील ८०पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णांकडून सरासरी दोन ते अडीच लाखांची बिले आकारून लूट केली गेली. हॉस्पिटल आधी सुरु झाले, नंतर पंधरा दिवसांनी त्याला महापालिकेची परवानगी मिळाली आहे. महापालिकेने दुदधनकर हॉस्पिटलविरोधात पोलिसात तक्रार दाखल करावी. याप्रकरणी दोषी असणाऱ्या सर्वांवर गुन्हे दाखल करावेत. डॉ. महेश दुदनकरसह आयुक्त व आरोग्य अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचे गुन्हा दाखल करावेत, अशी मागणी गायकवाड यांनी केली.
चौकट
आयुक्तांचा मनमानी कारभार
आयुक्त नितीन कापडणीस हे मनमानी कारभार करत आहेत. ते कोणालाच जुमानत नाहीत, माहिती देत नाहीत. अन्य अधिकारी केवळ नाममात्र असून, ते कापडणीस यांच्या दबावाखाली काम करतात. कापडणीस यांच्या कामावर नागरिकांसह पदाधिकारी, नगरसवेक व अधिकारीही नाराज आहेत. त्यांच्यावर सातत्याने गैरकारभाराचे आरोप होत आहेत. त्यांची चौकशी करावी, अशी मागणी गायकवाड यांनी केली.