पुनवत : शिराळा व शाहुवाडी तालुक्यात वारणा पट्ट्यातील गुळाच्या दराला आता उभारी मिळायला सुरुवात झाली आहे. कणदूर येथील गुऱ्हाळमालक सुभाष पाटील यांच्या सोळा रव्यांच्या दोन कलमांना कऱ्हाड बाजारपेठेत अनुक्रमे ४६00 ते ३९00 प्रति क्विंटल दर मिळाला. शाहुवाडी तालुक्यातील मालेवाडी येथील राजाराम बळवंत पाटील यांच्या गुळाला ५२00 रुपये इतका दर मिळाला. अन्य सात शेतकऱ्यांच्या गुळालाही ४000 रुपयांच्या वर दर प्राप्त झाला आहे. कऱ्हाड येथील व्यापारी उत्तमराव भाटवडेकर यांच्याकडे हा सौदा पार पडला.शिराळा व शाहुवाडी तालुक्यात गुऱ्हाळांचा निम्मा हंगाम आता संपला आहे. मध्यंतरीच्या थंडीमुळे उसाचा उतारा वाढला असून, अशा उसापासून आता चांगल्या प्रतीचा गूळ तयार होऊ लागला आहे.हंगामाच्या आतापर्यंतच्या काळात शेतकऱ्यांना गुळाला प्रति क्विंटल २१00 पासून ३४00, २५00 पर्यंतचा दर मिळाला आहे. त्यामुळे या दरात शेतकऱ्यांना गुऱ्हाळ उद्योग सर्व बाबींचा विचार करता फायद्याचा ठरलेला नाही.संक्रांतीनंतर आता हळूहळू शेतकऱ्यांच्या गुळाच्या काही कलमांना ४000 च्या वर दर मिळू लागला आहे. यामध्ये कणदूर येथील सुभाष पाटील यांना ४६00 व ३९00 चा दर मिळाला आहे. तसेच शाहुवाडी तालुक्यातील मालेवाडीच्या पाटील यांना ५२00, धोंडीबा दळवी यांना ४७00, कोतोलीच्या अरुण पाटील यांना ४५00, प्रशांत माळी यांना ४५१0, रंगराव पाटील यांना ३६00, तर कडवे येथील विजय खोत यांना ४११0 व नीलेश माळी यांच्या गुळाला ३८00 प्रति क्विंटल असा दर मिळाला आहे.एकंदरीत बाजारपेठेत बारीक कणी, चांगला रंग व गोडीचा गूळ पाठविणाऱ्या शेतकऱ्यांच्या गुळाला चांगला दर मिळू लागला असून, गुऱ्हाळ मालकांनी गुळाची प्रत सुधारल्यास त्यांच्यासह शेतकऱ्यांनाही फायदा होणार आहे. (वार्ताहर)
कणदूरच्या गुळाला ४६०० चा दर
By admin | Updated: January 30, 2015 23:14 IST