सांगली जिल्ह्यामध्ये ४२५ तळीरामांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 23:59 IST2019-04-19T23:59:22+5:302019-04-19T23:59:35+5:30
सचिन लाड । लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यापासून पोलिसांनी दररोज सुरू केलेल्या नाकाबंदीमध्ये तब्बल ४२५ ...

सांगली जिल्ह्यामध्ये ४२५ तळीरामांना अटक
सचिन लाड ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यापासून पोलिसांनी दररोज सुरू केलेल्या नाकाबंदीमध्ये तब्बल ४२५ तळीराम सापडले आहेत. या तळीरामांविरुद्ध जिल्हा न्यायालयात खटले दाखल करण्यात आले होते. न्यायालयात सर्व तळीरामांकडून प्रत्येकी दोन हजार रुपयांप्रमाणे साडेआठ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. दि. १० मार्च ते १८ एप्रिल या एक महिना व नऊ दिवसातील ही कारवाई आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी १० मार्चला आचारसंहिता लागली. तेव्हापासून जिल्ह्यातील २५ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दररोज नाकाबंदी करुन संशयित वाहनांची तपासणी केली जात आहे. यामध्ये दररोज दहा ते बारा तळीराम सापडत आहेत. सांगली आणि मिरज वाहतूक शाखेचे पोलीस कारवाईत आघाडीवर आहेत. तळीरामांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले जातात. वाहने जप्त केली जातात. दुसऱ्यादिवशी न्यायालयात खटले दाखल करून त्यांना हजर केले जाते. गुन्हा कबूल केल्यास दोन हजार रुपये दंड ठोठावला जातो. दंड भरल्याची पावती घेऊन ती पोलिसांना दाखविल्यानंतर जप्त केलेले वाहन सोडले जाते.
दारूच्या नशेत वाहन चालविताना पकडल्यानंतर अटकेची कारवाई, वाहन चालविण्याचा परवाना निलंबित, रद्द, हे उपाय तळीराम चालकांना अद्याप लागू पडलेले नाहीत. नशेत वाहन चालविल्याने अपघाती मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. रस्ता सुरक्षा अभियानाच्या माध्यमातून जनजागृती करूनही फरक पडला नाही. अनेकदा पोलिसांना पाहून काही तळीराम अन्य मार्गाने पळून जाण्यात यशस्वी होतात. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यापासून पोलीस २४ तास रस्त्यावर आहेत. संशयित वाहने तपासली जात आहेत. त्यावेळी नशेत वाहन चालविणारे तळीराम सापडत आहेत. १० मार्च ते १८ एप्रिल या एक महिना व नऊ दिवसात ४२५ तळीराम सापडले आहेत.