जलसंपदा मंत्र्यांकडून ४२ गावांची फसवणूक
By Admin | Updated: August 20, 2015 21:52 IST2015-08-20T21:52:10+5:302015-08-20T21:52:10+5:30
शिवसेनेचा आरोप : मुंबईत बैठक

जलसंपदा मंत्र्यांकडून ४२ गावांची फसवणूक
सांगली : जत तालुक्यातील ४२ गावांचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी ३२ कोटींचा निधी मंजूर केल्याचे आश्वासन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले होते, पण हा निधी म्हैसाळ योजनेसाठी फिरविला आहे. त्यामुळे ४२ गावांना एक रुपयाही मिळणार नाही. मंत्री महाजन यांनी दिलेले आश्वासन न पाळता ४२ गावांची फसवणूक केली आहे, असा आरोप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार व उप जिल्हाप्रमुख अजिंक्य पाटील यांनी केला आहे.ते म्हणाले की, शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांनी ४२ गावांचा पाणीप्रश्न निकालात काढण्याची हमी दिली आहे. असे असताना खासदार व आमदार यांनी पाणी संघर्ष समितीच्या पदयात्रा सांगता समारंभात भाषणे करून जणू काही हा प्रश्न भाजपच सोडविणार असल्याच्या वल्गना केल्या. महाजन यांच्या उपस्थितीत बैठक घडवून आणली. महाजन यांनी ३२ कोटींचा प्रस्तावित कामाला खर्च न करता ४२ गावांसाठी खर्च करू, असे आश्वासन दिले होते. परंतु हा निधी अर्थसंकल्पातील तरतुदीतील होता. त्याचा ४२ गावांशी संबंध नाही. हा निधी म्हैसाळ योजनेसाठी दिला आहे. श्रेयवादासाठी झपाटलेल्या भाजपने राजकारण आणून फटाके फोडले आहेत. महाजन यांनी ४२ गावांची फसवणूक केली आहे. शिवसेनेचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी याप्रश्नी बैठक बोलाविण्याचे आश्वासन दिले आहे. (प्रतिनिधी)