Sangli Election :सांगली महापालिकेसाठी दुपारपर्यंत ३४ टक्के मतदान, इव्हीएम मशिनवरुन काही काळ गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 17:32 IST2018-08-01T14:56:01+5:302018-08-02T17:32:41+5:30
Sangli Election सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेच्या पाचव्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवारी ( १ आॅगस्ट) दुपारी दीड वाजेपर्यंत सरासरी ३४ टक्के मतदान झाले आहे.

Sangli Election :सांगली महापालिकेसाठी दुपारपर्यंत ३४ टक्के मतदान, इव्हीएम मशिनवरुन काही काळ गोंधळ
सांगली : सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेच्या पाचव्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवारी ( १ आॅगस्ट) दुपारी दीड वाजेपर्यंत सरासरी ३४ टक्के मतदान झाले आहे.
सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेच्या ७८ जागांसाठी हे मतदान होत आहे. सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा आणि शिवसेना यांच्यात तिरंगी लढत आहे. सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाली.
दुपारी दीड वाजेपर्यंत ३४ टक्के मतदान झाले आहे. यामध्ये ६८९९0 महिलांनी तर ७४२९७ पुरुष आणि इतर ७ मतदारांसह एकूण १४,३२९४ जणांनी मतदान केले आहे.
सकाळी भोईराज सोसायटी हॉलयेथे प्रभाग १५ मधील मतदान केंद्रात मतदानावेळी थोडाासा गोंधळ झाला. ईव्हीएम मशिनला भाजपच्या बटणाला शाई लागल्याची काँग्रेससह सर्व उमेदवारांनी तक्रार केली. कोणतेही बटण दाबले की कमळाला मत जात असल्याची तक्रार त्यांनी केली, त्यावरुन वादावादी झाली. त्यामुळे मतदान काही काळ बंद करण्यात आले. यानंतर मुख्य निवडणूक अधिकारी आयुक्त रविंद्र खेबुडकर, निवडणूक अधिकारी भानुदास गायकवाड याच्याकडून तपासणी करण्यात आली. त्यांनी तक्रारदारांची शंका दूर करून मतदान पुन्हा सुरू केले.
जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांनी जिमखाना मतदान केंद्रांवर गुलाबपुष्प देऊन मतदारांचे स्वागत केले.
सांगलीत मतदारांच्या स्वागताची प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. अनेक मतदान केंद्रांवर रांगोळ्या काढून, विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. गुलाबपुष्प देऊन मतदारांचे स्वागत करण्यात येत आहे.
जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील , तर आयुक्त तथा निवडणूक अधिकारी रवींद्र खेबुडकर हे स्वत: मतदारांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. मतदान प्रक्रिया व्यवस्थित पार पाडावी यासाठी मोठा पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.