सांगलीत ३० टन नवीन बेदाण्याची आवक

By अशोक डोंबाळे | Updated: January 31, 2025 21:30 IST2025-01-31T21:30:23+5:302025-01-31T21:30:27+5:30

किलोला २२५ ते १९१ रुपये दर : बेदाण्याचे दर तेजीत राहण्याचा व्यापाऱ्यांचा अंदाज

30 tons of new raisins arrive in sangli | सांगलीत ३० टन नवीन बेदाण्याची आवक

सांगलीत ३० टन नवीन बेदाण्याची आवक

अशोक डोंबाळे, लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली :सांगली मार्केट यार्डात शुक्रवारी निघालेल्या नवीन बेदाणा सौद्यास सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी ३० टन बेदाण्याची आवक झाली होती. हिरव्या बेदाण्यास प्रतिकिलो २२५ तर पिवळ्या बेदाण्यास १९१ रुपये दर मिळाला. बेदाण्याचे उत्पादन कमी असल्यामुळे दर तेजीत राहण्याचा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे.

सांगली बाजार समितीमध्ये नूतन बेदाणा सौद्याचा प्रारंभ सभापती सुजय शिंदे यांच्या हस्ते केला. यावेळी संचालक जयाभाऊ नलवडे, शशिकांत नागे, पप्पू मजलेकर, कडप्पा वारद, सचिव महेश चव्हाण, व्यापारी उपस्थित होते.

शुक्रवारी झालेल्या नवीन बेदाणा सौदा शुभारंभप्रसंगी सात दुकानात ३० नवीन बेदाण्याची आवक झाली. खंडेराजुरीचे शेतकरी प्रमोद चौगुले यांच्या हिरव्या बेदाण्यास प्रतिकिलो २२५ रुपये दर मिळाला. नितीन चौगुले यांच्या हिरव्या बेदाण्यास प्रतिकिलो २२१ रुपये दराने व्यापाऱ्यांनी खरेदी केला. पिवळ्या बेदाण्यास प्रतिकिलो १९१ रुपये दर मिळाला.

यावेळी ज्येष्ठ व्यापारी अशोक बापना, बेदाणा असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र कुंभार, सतीशभाई पटेल, कांतीबाई पटेल, सुशील हडदरे, कृष्णा मर्दा, रवि हजारे, सौदाप्रमुख देवेंद्र करे, नियमन प्रमुख कुमार दरूरे, अतुल जाधव आदी उपस्थित होते.

बेदाण्याचे प्रतिकिलो दर

हिरवा बेदाणा १८० ते २२५ रुपये,
मध्यम बेदाणा १३० ते १७० रुपये
काळा बेदाना ६० ते १०० रुपये
पिवळ्या बेदाणा १८० ते १९१ रुपये

द्राक्ष छाटणी उशिरा झाली आहे. तसेच द्राक्षाचे उत्पादनही कमी आहे. यामुळे दर चांगला असणार आहे. बेदाण्याचेही दर तेजीतच असणार आहेत. शेतकऱ्यांनी सांगली बाजार समितीत जास्तीत जास्त बेदाणा विक्रीस आणावा. - सुजय शिंदे, सभापती, सांगली बाजार समिती.

Web Title: 30 tons of new raisins arrive in sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.